

सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यामध्ये दरेगावी रविवारी रात्री तब्बल चार तास गुफ्तगू झाली. दोन्ही नेते रविवारी रात्री 11 पासून सोमवारी पहाटे 3 पर्यंत विचारमंथनात गुंतले होते. वाई विधानसभा मतदारसंघातील विकासकामांवर यावेळी विशेष चर्चा झाल्याचे सांगितले जात असले, तरी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवरही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, नेमकी राजकीय चर्चा काय झाली? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
ना. एकनाथ शिंदे हे तीन दिवसांपासून दरे मुक्कामी होते. ना. शिंदे यांनी परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. या दौऱ्यावेळी ना. मकरंद पाटील हे मुंबईत होते. मात्र, ना. पाटील यांनी रविवारी रात्री दरेगावी जाऊन ना. शिंदे यांची भेट घेतली. या परिसरात होणाऱ्या विकासकामांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. कोयनेवरचा तापोळा पूल, पाचवड खेड महामार्ग, नव्याने होऊ घातलेले मोठे पूल तसेच कांदाटी खोरे ते तापोळा जोडणारा पूल महिनाभरात सुरू करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही सर्व कामे पावसाळ्याआधी करण्याच्या अनुषंगानेही चर्चा झाली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. अध्यक्ष निवडीविरोधात विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर दि. 20 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीर सदस्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे संबंधितांना सुनावणीच्या नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी वेगाने हालचाली कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी व शिवसेनेतर्फे सदस्यांनी ना. मकरंद पाटील व ना. शंभूराज देसाई यांच्याकडे केली आहे. निवडीवेळी झालेला प्रकार सुनावणीवेळी टाळण्यासाठी काय करता येईल याबाबत ना. शिंदे आणि ना. पाटील यांची खोलीबंद चर्चा झाल्याचे वृत्त आहे.