पंचगंगा पूर
पंचगंगा पूर

पंचगंगेच्या पुराला उतार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरकरांच्या उरात धडकी भरवणार्‍या पंचगंगेच्या पुराला आता उतार सुरू झाला आहे. शनिवारी पावसाने उसंत घेतल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत घट सुरू झाली आहे. 41.4 फुटांपर्यंत गेलेली पातळी रात्री 41 फुटांपर्यंत खाली आली. जिल्ह्यातील आणखी 18 बंधार्‍यांवरील पाणी ओसरल्याने त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. कोल्हापूर शहरातील काही भागांना पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव आणि कडवी धरण शनिवारी पूर्ण क्षमतेने भरले. राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे.

दोन दिवसांत जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. शनिवारी सकाळपासूनच पावसाची उघडीप होती. अधूनमधून सूर्यदर्शनही होत राहिले. जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतली. धरण परिसरातही पावसाचा जोर ओसरला होता. राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी खुला झाला. या दरवाजासह धरणातून 2828 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुंभी धरण परिसरातही पाऊस कमी झाल्याने धरणातील विसर्गही कमी करण्यात आला आहे. धरणातून सध्या 300 तर कोदे धरणाच्या सांडव्यावरून 743 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणातील विसर्ग आणि पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती वेगाने ओसरत चालली आहे. जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात आणखी 18 बंधार्‍यांवरील पाणी कमी झाले. यामुळे पाणी आल्याने बंद असलेली वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. जिल्ह्यात पंचगंगेवरील सात बंधार्‍यांसह 10 नद्यांवरील अद्याप 49 बंधारे पाण्याखाली आहेत. यामुळे काही मार्गांवरील वाहतूक बंद आहे. पावसाचा जोर कमी राहिला तर सोमवारपर्यंत पंचगंगेवरील वगळता बहुतांशी सर्व बंधारे खुले होतील.

पंचगंगेच्या पातळीत शुक्रवारी वाढ सुरू होती. पहाटे चार वाजता पाणी पातळी 41.4 फुटांपर्यंत गेली. सकाळी आठ वाजल्यापासून त्यात घट सुरू झाली. रात्री आठ वाजता पाणी पातळी 41 फुटांवर गेली. पाणी पातळी कमी झाल्याने कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील पाणीही ओसरले. पुणे-बंगळूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर आलेल्या पाण्याच्या पातळीत काहीशी घट झाली. पावसाने गेल्या दोन दिवसांपासून उसंत घेतल्याने परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. महापुराच्या भीतीने स्थलांतरित झालेले नागरिक स्वगृही परतण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कासारी, कडवी, पाटगाव, घटप्रभा आणि कोदे धरण परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली. उर्वरित धरण परिसरात पावसाचा जोर कमीच राहिला. शाहूवाडी तालुक्यातील 2.51 टीएमसी क्षमतेचे कडवी धरण शनिवारी सकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणाच्या सांडव्यातून 845 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून 6 हजार 788 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत संथ वाढ सुरू आहे.

जिल्ह्यात शनिवारी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 7.7 मि.मी.पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 21.9 मि.मी.पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. शाहूवाडीत 16.4 मि.मी., भुदरगडमध्ये 20.1 मि.मी. तर चंदगडमध्ये 13.2 मि.मी.पाऊस झाला. अन्य तालुक्यांत दहा मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाला.

नागरिकांना दिलासा

कोल्हापूर शहरात शनिवारी पावसाने उघडीप दिली. सकाळपासून दिवसभरात अनेकवेळा सूर्यदर्शन झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळीही कमी होऊ लागली आहे. शहरातील पंचगंगेचे पाणी शुक्रवार पेठेतील जामदार क्लबच्या खालीपर्यंत गेले. नदीचे पाणी ओसरू लागल्याने पुराचे पाणी आलेल्या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

'अलमट्टी'तून 75 हजार क्यूसेक विसर्ग

अलमट्टी धरणात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 90.33 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणी पातळीही 517.46 मीटर झाली आहे. आज धरणातून 75 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच होता. धरणातून याच पद्धतीने विसर्ग सुरू राहिला तर कोल्हापूरचा पूर झपाट्याने ओसरण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील पाचवे धरण भरले

कडवी धरण शनिवारी सकाळी भरले. जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांपैकी जुलै महिन्यातच भरलेले हे पाचवे धरण आहे. यापूर्वी जिल्ह्यातील घटप्रभा, जांबरे, कोदे, राधानगरी ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news