कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्रातील सहा जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीने पटकाविल्या, तर प्रत्येकी एक जागा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला गटाला मिळाली. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला. व कोकणातून सात जागांमध्ये महाविकास आघाडीने तीन, महायुतीने तीन तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शाहू महाराज हे एक लाखांवर मतांनी विजयी झाले. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या सोलापुरातून 80 हजारांवर मतांनी विजयी झाल्या तर माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील 50 हजारांहून मताधिक्यांनी विजयी झाले.
सांगलीतून विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार 1 लाख 1 हजार 694 मतांनी विजयी झाले आहेत. कोल्हापुरातून काँग्रेसचे शाहू महाराज विरुद्ध शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक अशी लढत होती. या एकतर्फी लढतीत मंडलिक यांचा पराभव झाला. हातकणंगलेत शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील-सरुडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील अशी चौरंगी लढत होती. या उत्कंठावर्धक लढतीत माने यांनी विजय मिळविला.
सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती. तेथे ठाकरे शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना रिंगणात उतरवले होते, तर भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील हे रिंगणात होते. मात्र, मतदारांनी विशाल पाटील यांच्या पारड्यात मताचे दान देऊन त्यांना विजयी केले. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशा लढतीत शिंदे यांनी बाजी मारली.
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या विरोधात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी लढत होती. या लढतीत मोहिते-पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. सातार्यात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत होती. सुरुवातीच्या फेर्यांमध्ये शिंदे यांनी चांगली आघाडी घेतली होती; मात्र शेवटच्या फेर्यांत उदयनराजे यांनी शिंदे यांना हरविले.