कोल्हापूर : अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजविण्यास रणरागिणी सज्ज

कोल्हापूर : अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजविण्यास रणरागिणी सज्ज

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : स्त्रीशक्तीच्या सन्मानासह महिलांच्या शारीरिक, आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठी, त्यांच्यात खेळांची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या क्रीडा कौशल्याला पाठबळ मिळावे, या उद्देशाने 'पुढारी राईज अप'अंतर्गत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात प्रथमच महिलांच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक मैदानावर दि. 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा पूर्णपणे मोफत असल्याने यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील तब्बल 1,500 शाळा-महाविद्यालयीन महिला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, दि. 2 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होईल. यावेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या महिला अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे छत्रपती, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी, चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे, शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव व्ही. एन. शिंदे, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा आडसुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, स्पर्धेची जय्यत तयारी मैदानावर करण्यात आली आहे. स्पर्धेचा आनंद क्रीडाप्रेमींना दिवसभर लुटता यावा यासाठी मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीवर मंडप घालण्यात आला असून, बसण्याचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानावर तीन दिवस रंगणार्‍या स्पर्धेसाठी विविध मैदाने सज्ज करण्यात आली आहेत.

6 वयोगट आणि 19 प्रकारांत स्पर्धा

स्पर्धा 9, 11, 13, 15, 17 आणि 19 वर्षांखालील अशा एकूण 6 वयोगटांत आणि विविध 19 प्रकारांत होणार आहे. यात 30, 50, 80, 100, 200, 400, 600, 800, 1 हजार, 1,500 व 3 हजार मीटर धावणे, 80 व 100 मीटर अडथळा, 4 बाय 50 मीटर, 4 बाय 100 मीटर व 4 बाय 400 रिले, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी या प्रकारांचा समावेश असणार आहे.

प्रशस्तिपत्र, पदकांसह रोख बक्षिसे

स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकासह प्रशस्तिपत्र दिले जाणार आहे. याखेरीज सर्व गटांतील पहिल्या सहा क्रमांकांच्या विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक देऊनही गौरविण्यात येणार आहे.

सायंकाळी केएमटी बसची व्यवस्था

स्पर्धेसाठी येणार्‍या महिला-मुलींसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने केएमटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी 5 व 6 वाजता शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ट्रॅक ते कोल्हापूर रेल्वेस्थानक या मार्गावर दोन बसेसची व्यवस्था असणार आहे. याशिवाय दिवसभर कागल, कणेरीमठ या मार्गावरील बसेसही सिंथेटिक ट्रॅक मैदानाशेजारील स्टॉपला थांबणार आहेत. याचा लाभ महिला खेळाडू, पालक, प्रशिक्षकांनी घ्यावा, असे आवाहन केएमटी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news