कोल्हापूर : चाचण्यांसाठी सरकारी प्रयोगशाळांचे दरवाजे उघडा!

कोल्हापूर : चाचण्यांसाठी सरकारी प्रयोगशाळांचे दरवाजे उघडा!

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : देशामध्ये कोरोना, एच3 एन2 आणि एएच1 एन1 या विषाणूबाधित रुग्णसंख्येचा आलेख वाढतो आहे. कोल्हापुरातही दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखीने ग्रस्त रुग्ण गर्दी करू लागले आहेत. या रुग्णांच्या रोगनिदानासाठी आवश्यक चाचण्या वेळेत करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांसाठी अशा चाचण्या मोफत करण्यासाठी सार्वजनिक निधीतून उभ्या केलेल्या राजर्षी शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळांचे दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे.

कोरोनाच्या पहिल्या आवर्तनामध्ये ज्या पद्धतीने रुग्णांचे स्वॅब व रक्ताचे नमुने घेण्यासाठी गावपातळीपर्यंत एक मोठी साखळी उभी केली गेली. त्याच पद्धतीने पावले उचलली, तर कोरोनाला जिल्ह्याच्या हद्दीबाहेरच रोखता येणे शक्य आहे. कोल्हापुरात सध्या आढळून येत असलेले रुग्ण संमिश्र स्वरूपाचे आहेत. कोणाला एका विषाणूच्या संसर्गाने ग्रासले आहे, तर कोणाला कोरोना व एच3 एन2 या दोन्हीही विषाणूंच्या संसर्गाने बाधा केली आहे. अशा रुग्णांच्या अचूक रोगनिदानासाठी खासगी दवाखाने, प्रयोगशाळांमध्ये चाचण्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. किंबहुना, त्यामुळेच काही रुग्ण आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करताहेत आणि नेमकी हीच स्थिती विषाणूंचा संसर्ग पसरविण्यास पोषक ठरते आहे.

या चाचण्यांसाठी राज्य शासनाने कोल्हापुरात कोट्यवधी रुपये खर्चून तीन सुसज्ज प्रयोगशाळा उभ्या केल्या. यातील दोन यंत्रे राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर एक यंत्र डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत उभारण्यात आले आहे. या यंत्रसामग्रीचा नागरिकांना लाभ उपलब्ध करून दिला; तर नागरिकांचे पैसे वाचू शकतात, त्यांचे रोगनिदान वेळेवर होऊन संसर्गाला अटकाव करता येऊ शकतो. शिवाय, राज्य शासनाने खरेदी केलेल्या आणि धूळ खात पडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या यंत्रणेचा नागरिकांसाठी वापरही होऊ शकतो.

कोल्हापुरात आठवडाभरात बाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर गेली आहे. जिल्ह्यातील संसर्गाचा दर 1 टक्क्यावर आहे. याचा विचार केला, तर 70 रुग्ण आढळण्यासाठी सुमारे 7 हजार चाचण्या होणे आवश्यक ठरते. परंतु, मार्च 2023 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या 317 इतकी आहे; मग उर्वरित चाचण्या कोठे झाल्या? त्यासाठी रुग्णांना किती पैसे मोजावे लागले? याचा हिशेब घातला, तर शासकीय यंत्रणेने वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रयोगशाळांचे किलकिले असलेले दरवाजे खुले करण्याची गरज आवश्यक ठरते. ती किती गांभीर्याने घेतली जाते, यावर कोरोनाचा अटकाव अवलंबून आहे.

शासकीय यंत्रसामग्री धूळ खात पडली अन्…

राज्यात कोरोनाने प्रवेश केल्यानंतर राज्य शासनाकडून कोल्हापूरला आरटी-पीसीआर चाचण्यांची अत्याधुनिक तीन यंत्रे मिळाली होती. या यंत्रांद्वारे दैनंदिन सरासरी 8 ते 10 हजार रुग्णांच्या चाचण्या होऊ शकतात. या चाचण्या सक्षमपणे होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी तंत्रज्ञांचे आवश्यक ते सर्व मनुष्यबळ प्रयोगशाळांना पुरविले होते. चाचण्यांसाठी आवश्यक कीटस्, रिएजंटस् यांची खरेदीही झाली होती; पण प्रत्यक्षात शासकीय यंत्रणा सक्षम आणि उपलब्ध असतानाही हे नमुने खासगी प्रयोगशाळांकडे पाठविण्याचा द्राविडी प्राणायाम प्रशासकीय यंत्रणेने केला. यामुळे शासकीय यंत्रसामग्री धूळ खात पडली आणि कर्मचार्‍यांचे मनुष्यबळही निरुपयोगी ठरले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news