

गुडाळ; आशिष पाटील : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शासनाच्या वतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. दरम्यान, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्याचा शासनाचा निर्णय या शैक्षणिक वर्षापासून अंमलात येणार आहे. आता प्रत्येक तिमाहित केवळ एकच एकत्रित पुस्तक विद्यार्थ्यांना शाळेत आणावे लागणार आहे.
शिक्षण विभागाकडून बालभारती एकात्मिक भाग एक ते चार अशा चार भागात सर्व विषयांची एकत्रित चार पुस्तके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक तिमाहीत अनुक्रमे त्यातील एक पुस्तक विद्यार्थ्यांना शाळेत आणावे लागणार आहे. विशेष म्हणजे या पुस्तकातील प्रत्येक धड्यानंतर टाचण आणि प्रश्नोत्तरासाठी वहीची दोन कोरी पाने जोडण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना या मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळेल. इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि कायमस्वरूपी विनाअनुदानित शाळा मधील विद्यार्थ्यांना मात्र मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळणार नाही. एकंदरीत यावर्षी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी झाल्याने आणि नवीन स्वरूपात एकच एकत्रित पुस्तक शाळेत न्यावे लागणार असल्याने विद्यार्थी खुश होणार आहेत. दि.१५ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातील चार पुस्तके एकत्र देण्यात येणार आहे.
हेही वाचा;