

कोल्हापूर, सुनील कदम : गेल्या साठ वर्षांत महाराष्ट्रात केवळ 1186 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वेमार्गाची भर पडली आहे. देशाला सर्वाधिक महसूल देणार्या महाराष्ट्रावर हा एक प्रकारे अन्यायच आहे. त्यामुळे किमान भविष्यात तरी महाराष्ट्रातील नवीन रेल्वेमार्गाना, रेल्वेमार्गांच्या दुहेरीकरणाला आणि एकूणच रेल्वेच्या विस्तारीकरणाला वेगाने चालना देण्याची गरज आहे.
देशात रेल्वेचे जे अठरा विभाग आहेत, त्यापैकी मध्य रेल्वे, दक्षिण मध्यरेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे, दक्षिण पूर्व मध्यरेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वे हे सहा विभाग महाराष्ट्राशी निगडित आहेत. यापैकी मध्ये रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे या तीन विभागांचे मुख्यालयच मुंबईत आहे. याशिवाय राज्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पुणे, भुसावळ, नागपूर, जळगाव, अकोला, वर्धा, सेवाग्राम, बडनेरा, बल्हारशाह, सोलापूर, दौंड, मिरज, पूर्णा, परभणी, लातूर रोड, मुदखेड, वसई रोड, गोंदिया, भंडारा रोड, चाळीसगाव ही रेल्वे जंक्शन्स आणि छोटी-मोठी अशी 185 रेल्वे स्थानके आहेत.
मात्र गेल्या साठ वर्षांत राज्यात अपेक्षित प्रमाणात रेल्वेमार्गांचा विस्तार झालेला दिसत नाही. 1960 साली राज्यात 5056 किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग होते, सध्या राज्यातील एकूण रेल्वेमार्गांची लांबी 6246 किलोमीटर इतकी आहे. याचा अर्थ गेल्या साठ वर्षांत राज्यातील रेल्वेमार्गांच्या लांबीत केवळ 1186 किलोमीटरची भर पडली आहे. हे प्रमाण वार्षिक केवळ 19.76 किलोमीटर एवढे नगण्य आहे. ज्या राज्यात रेल्वेच्या तीन-तीन विभागांची मुख्यालये आहेत आणि जिथे पंचवीसभर रेल्वे जंक्शन आहेत, त्या भागात वास्तविक पाहता रेल्वेचे जाळे विस्तारायला पाहिजे होते, पण तसे झालेले दिसत नाही.
केंद्र शासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेच्या नवीन मार्गासाठी आणि रेल्वेमार्गांच्या विस्तारीकणासाठी जवळपास 13 हजार 539 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात राज्यातील रेल्वेमार्गांची लांबी जवळपास 900 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय जवळपास 1400 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गांचे विस्तारीकरणही प्रस्तावित आहे. देशाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ख्याती आहे.
देशाच्या एकूण उत्पन्नापैकी जवळपास दहा टक्के उत्पन्न महाराष्ट्रातून जमा होते. त्याचप्रमाणे आजकाल राज्यातील बहुतांश तालुक्यांच्या ठिकाणी आणि लहान-मोठ्या शहरांमध्ये औद्योगिक वसाहती उभा राहू लागलेल्या आहेत. या सगळ्या बाबी विचारात घेता राज्यातील सर्व प्रमुख शहरे आणि औद्योगिक वसाहतीच्या प्रदेशात नवीन रेल्वेमार्ग होण्याची आवश्यकता आहे. देशाच्या अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वेच्या विकासासाठी जी साडेतेरा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे, त्यापैकी बहुतांश रक्कम ही मोठ्या शहरांमधील रेल्वेस्थानकांचा विकास आणि दुरुस्ती, काही मार्गांचे दुहेरीकरण यासह अन्य कामांसाठी खर्च होणार आहे. नवीन रेल्वेमार्गासाठी फक्त 1141 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यातून राज्यात केवळ 832 किलोमीटर लांबीचे नवीन रेल्वेमार्ग होणार आहेत. मात्र महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये रेल्वेमार्गाचे जाळे विस्तारण्यासाठी आणखी खास तरतूद करण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्रातील प्रस्तावित नवीन रेल्वेमार्ग
* अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ : 250 किलोमीटर
* वर्धा-नांदेड-यवतमाळ-पुसद : 270 किलोमीटर
* धुळे- नंदूरबार : 50 किलोमीटर
* सोलापूर-उस्मानाबाद-तुळजापूर : 84 किलोमीटर
* कल्याण – मुरबाड-उल्हासनगर : 28 किलोमीटर
* फलटण – पंढरपूर : 150 किलोमीटर