Pune Crime News | एक खून... तीन कहाण्या!

Pune Crime News | रात्रीचे साडेनऊ वाजले होते. एपीआय गणेश जगदाळे त्या दिवशी चंदननगर पोलिस ठाण्यात दिवसपाळीच्या कर्तव्यावर होते.
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

रात्रीचे साडेनऊ वाजले होते. एपीआय गणेश जगदाळे त्या दिवशी चंदननगर पोलिस ठाण्यात दिवसपाळीच्या कर्तव्यावर होते. अचानक एका खासगी रुग्णालयातून पोलिसांना फोन आला. समोरील व्यक्तीने सांगितले, 'एक तरुण जखमी अवस्थेत रुग्णालयात आणला आहे. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.' पोलिस रुग्णालयात पोहोचले. समोर मृत तरुण निपचित पडला होता आणि त्याच्यासोबत असलेला मित्र घाबरलेला दिसत होता. त्याला नेमके काय झाले, असा सवाल पोलिसांनी केला...

मित्र आशिष याने सांगितलेली कहाणी साधी होती. पण पोलिसांना ती काही पचनी पडली नाही. आशिषचा मित्र राहुल याच्या मृत्यूचे कारण आणि तो सांगत असलेली हकीकत यात काहीतरी दडले आहे, अशी पोलिसांना प्रथम शंका आली. मग पोलिसांनी आशिषला सोबत घेतले आणि राहुलच्या खोलीकडे मोर्चा वळवला आणि तिथे पोहोचताच आशिषची पहिली सांगितलेली कहाणी बदलली! आता त्याने वेगळीच हकीकत सांगायला सुरुवात केली.

Crime News
Kolhapur News| ब्रँडिंगसाठी ‘कोल्हापूर महोत्सव’सारखे उपक्रम राबवा

राहुल जवंजाळ आणि आशिष मगर हे दोघेही फूड डिलिव्हरीचे काम करत होते. राहुलने सायंकाळी फोन करून त्याला खोलीवर बोलावले होते. आशिष बाथरूममध्ये गेला असताना राहुल ओरडला. आवाज ऐकून तो बाहेर आला. पाहतो तर काय, राहुलने घरातील चाकू स्वतःच्या छातीत मारून घेतला होता!

इतकेच नव्हे, तर जखमी राहुलला आपण मोपेडवर बसवून रुग्णालयाकडे निघालो. वाटेत राहुल बेशुद्ध झाला. त्यानंतर दुचाकी तिथेच सोडून रिक्षाने त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्याचेही त्याने सांगितले. पण आता पोलिसांच्या नजरेत संशय आणखी गडद झाला होता. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक पोहोचले. घराचा पंचनामा सुरू झाला. रक्ताने माखलेले ब्लँकेट सापडले. टॉवेलवरही रक्ताचे डाग होते.

दुचाकीवर रक्ताचे डाग आढळले. पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतली. दरम्यान, राहुलच्या शवविच्छेदनाचा अहवाल आला. छातीत झालेल्या खोल जखमेमुळे त्याचा मृत्यू झाला होता. आता प्रश्न एकच होता, राहुलने स्वतःच्या छातीत एवढ्या जोरात चाकू कसा मारला होता? आशिष सांगत असलेला घटनाक्रम आणि या सगळ्या रक्तरंजित खुणा यातील तफावत काय सांगत होत्या?

अशोक मोराळे, पुणे

९ सप्टेंबरचा दिवस उजाडला. आशिषची पोलिसांकडून पुन्हा चौकशी सुरू झाली. सकाळापासून सुरू असलेली चौकशी दिवसभर चालली. पोलिसांकडे घटनास्थळावरील पुरावे होते. शवविच्छेदनाचा अहवाल होता. आशिषच्या दोन वेगवेगळ्या कहाण्या होत्या. पोलिसांचे प्रश्न सुरूच होते... आणि अखेर रात्री उशिरा आशिषची तिसरी कहाणी बाहेर आली. यावेळी त्याने राहुलच्या मृत्यूमागचे कारण सांगितले.

आशिषने राहुलला ६०० रुपये उसने दिले होते. पैसे परत करण्यास राहुलकडून विलंब होत होता. आशिष वारंवार फोन करत होता. मात्र राहुल फोन घेत नव्हता. त्यामुळे ८ सप्टेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास आशिष राहुलच्या खोलीवर पोहोचला.

पैशांवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढत गेला. राहुलने घरातील चाकू हातात घेतला. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू होती. 'हाथ से क्यों मारता है, चाकू से मार' असे म्हणत राहुलने चाकू आशिषच्या हातात दिला. क्षणभरात संतापाचा पारा चढला. राहुलने आई-वडिलांवरून शिवीगाळ केल्याचा राग आल्याचे सांगत आशिषने त्याच चाकूने राहुलच्या छातीत जोरदार वार केला.

वार वर्मी लागला होता. राहुलच्या छातातून रक्त वाहू लागले. आशिष घाबरला. घरातील टॉवेल घेऊन त्याने राहुलच्या जखमेवर दाब दिला. त्याला आधार देत जिन्‍याने खाली आणले. दुचाकीवर बसवले आणि रुग्णालयाच्या दिशेने निघाला. पण काही अंतरावरच राहुल बेशुद्ध झाला. त्याने दुचाकी तिथेच सोडली. रिक्षा पकडून राहुलला पहिल्यांदा एका खासगी रुग्णालयात, त्यानंतर तिथून मोठ्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

Crime News
Kolhapur News| कोल्हापूर विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढवा : राज्यपाल जिष्णू देव वर्मा

डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केले. खून केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आशिषने एक-दोन नव्हे, तर तीन वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या. सुरुवातीला राहुलला स्वतःच जखम झाल्याचे सांगितले. नंतर त्याने स्वतःच्या छातीत चाकू मारल्याची कहाणी रचली. मात्र, घटनास्थळावरील पुरावे आणि शवविच्छेदन अहवालासमोर त्याच्या दोन्ही कहाण्या फार काळ टिकल्या नाहीत.

अखेर ६०० रुपयांच्या व्यवहारातून सुरू झालेल्या वाद मित्राच्या खुनावर येऊन थांबला आणि पोलिसांच्या तपासापासून वाचण्यासाठी रचलेल्या तीन कहाण्यांचा खेळ अखेर एका कबुलीने संपला. आशिष मगर याला पोलिसांनी अटक केली. अतिशय कौशल्यापूर्वक तपास करत पोलिस उपायुक्त अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप, गुन्हे निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news