

मलकापूर, पुढारी वृत्तसेवा : गतीमंद युवतीवर केलेल्या अत्याचारप्रकरणी मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील अनिल गणपती भोपळे (वय 55) यास शाहूवाडी पोलिसांनी रविवारी अटक केली.
गतिमंद युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी भोपळे याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली नव्हती. पोलिसांनी संशयित आरोपीस अटक न केल्याच्या निषेधार्थ रविवारी मलकापुरातील सर्व व्यवहार बंद ठेऊन निषेध रॅली काढली होती. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र सावत्रे यांच्याकडे शहरातील महिलांनी संबंधित आरोपीस अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती.
संतप्त मलकापूरवासीयांचा उद्रेक लक्षात घेऊन शाहूवाडी पोलिसांनी भोपळे यास अटक केली. सोमवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आंबले करीत आहेत.