

सरवडे : पुढारी वृत्तसेवा : ओंकार शुगर अँड डिस्टीलरी पाँवरचे सर्वेसर्वा बाबुराव बोत्रे पाटील हे साखर उद्योगातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्र राज्यात ९ कारखाने चालवतात. त्यांनी राज्यातील अडचणीतील व अरिष्टातील कारखान्याना तसेच शेतकरी व कामगारांना आर्थिक पाठबळ देऊन न्याय दिला आहे. या कारखान्याने गतसाली ११२ दिवसात २.४० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट साध्य केले.१२.५१ साखर उताऱ्यासह जवळपास ३.१ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले. यावर्षीही ४ लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्टाबरोबर ८.५ मेगावँटचा कोजन प्रकल्पही सुरू होत आहे. तसेच जिल्ह्यातील इतर कारखान्यांप्रमाणे जास्तीत- जास्त दर देणार असल्याची ग्वाही जनरल मँनेजर शत्रुघ्न पाटील यांनी दिली.
फराळे (ता. राधानगरी) येथील ओंकार शुगर अँड डिस्टीलरी पाँवर प्रा. लि.युनिट नं ३ च्या दुसऱ्या गळीत हंगामातील बॉयलर अग्निप्रदिपन, मोळी व काटा पूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन ओमराजे बोत्रे पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक प्रशांत दादासाहेब बोत्रे पाटील होते.
यावेळी ११ महिला ऊस उत्पादक शेतकरी महिलांच्या हस्ते मोळी पूजन करुन गव्हाणीत ऊस टाकण्यात आला. कार्यक्रमास विनायक पाटील, राजेंद्रकुमार पाटील, शरद पाटील, रोहित जाधव, ज्ञानदेव पाटील, वैशाली संदीप डवर, तुकाराम परिट, विलास पाटील आदींसह पदाधिकारी, मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक शेती अधिकारी समीरकुमार व्हरकट यांनी, विश्वास आरडे यांनी सुत्रसंचालन तर राहुल यादव यांनी आभार मानले.