

नृसिंहवाडी : पुढारी वृत्तसेवा
श्री दत्तात्रेयांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंहवाडीत गुरुवारी (२७ नोव्हेंबर) दत्तजयंती महोत्सवास प्रारंभ होत आहे. संपूर्ण कृष्णा–पंचगंगा तीर भक्तिरसात न्हाऊन निघाले असून सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे
परंपरेनुसार, यंदाच्या उत्सवाचा मान विनोद पुजारी (राजोपाध्ये) व बंधू यांच्याकडे आहे. उत्सवाचे मानकरी म्हणून पुजारी कुटुंबाकडून दत्त देवस्थानच्या सहकार्याने सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य जन्मकाळ सोहळा ४ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असून सुमारे पाच ते सहा लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. उत्सवकाळात काकडआरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, धुपारती, पालखी सोहळा आदी नित्यक्रम पार पडणार आहेत. तसेच दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
यंदा रुद्रनाथ कुलकर्णी (कोल्हापूर), क्षितिजा सहस्रबुद्धे (मुंबई), स्वरदा खाडिलकर (सांगली), आदिनाथ वैद्य (पुणे), श्रद्धा जोशी (मिरज) या गायकांची संगीतसेवा मिळणार आहे. रसिकांना शास्त्रीय, भक्तीगीत, भावगीतांची पर्वणी लाभणार आहे. सद्गुरू भजनी मंडळ, स्वत्मानंद भजनी मंडळ (पुणे), शिवोली भजनी मंडळ (गोवा), नृसिंहसरस्वती स्वर साधना मंडळ, कुलदीप साळोखे, दिलीप सुतार यांची भजनसेवा होणार आहे. दररोज रात्री ९:३० वाजता ह.भ.प. संकेतबुवा काणे यांचे कीर्तन होणार आहे.
४ डिसेंबर रोजी अमोल पटवर्धन व अभिषेक पटवर्धन यांचा 'गुरुनामाची ओढ' हा विशेष सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवासाठी संयोजक विनोद पुजारी, संजय पुजारी, नारायण पुजारी, दत्तात्रय पुजारी, मोरेश्वर पुजारी यांच्यासह समस्त पुजारी (राजोपाध्ये) कुटुंब परिश्रम घेत आहे.
पुजारी राजोपाध्ये यांच्या निवासस्थानी 'श्रीं'चा पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात येणार
दत्त जन्मकाळ सोहळ्यावेळी श्रींची उत्सवमूर्ती मुख्य मंदिरात आणली जाते. फुलांनी सजवलेल्या चांदीच्या पाळण्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती स्वरूपात तीन श्रीफळ ठेवली जातात. पाळण्याची विधिवत पूजा करून अबिराची उधळण केली जाते आणि जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर समस्त ब्रह्मवृंदांकडून 'उद्धरी गुरुराया…' पाळण्याचे गायन केले जाते. जन्मकाळानंतर मानकरी पुजारी राजोपाध्ये यांच्या निवासस्थानी 'श्रीं'चा पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
“श्री दत्त जयंती सोहळा हा नृसिंहवाडीतील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या सोहळ्याचे मानकरीपद लाभणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. एकूण पुजारी कुटुंबांपैकी प्रत्येक आठ वर्षांनी उत्सवाचा मान आम्हाला मिळतो. यंदा दत्त देवस्थान आणि समस्त पुजारी व भक्तांच्या सहकार्याने भव्य स्वरूपात उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.”
विनोद पुजारी (राजोपाध्ये)