

कोल्हापूर : रिक्षा चालवत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 26) पहाटे शहरातील कळंबा जेलसमोर घडली. विलास वसंत चाबूक-पाटील (वय 62, रा. अहिल्यादेवी होळकर नगर, रिंगरोड, फुलेवाडी) असे या दुर्दैवी चालकाचे नाव आहे. या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चाबूक-पाटील हे पहाटेच्या सुमारास मार्केट यार्ड येथून विक्रेत्यांची भाजी घेऊन ठिकठिकाणी रिक्षातून पोहोच करण्याचे काम करत होते. नेहमीप्रमाणे ते बुधवारी पहाटे चारच्या सुमारास घरातून बाहेर पडले. मार्केट यार्डमध्ये विक्रेत्यांची भाजी घेतली. पहिल्यांदा कसबा बावडा येथे भाजी दिली. तेथून कळंबा येथे आले. तेथे भाजीच्या बॅगा ठेवल्या. येथून पाडळकर मार्केटकडे जात असताना कळंबा जेल परिसरात त्यांना रिक्षातच हृदयविकाराचा झटका आला. त्यातूनही त्यांनी रिक्षाचा ब—ेक लावला. रिक्षा थांबल्यानंतर ते रिक्षातच कोसळले. नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये आणण्यात आले; परंतु येथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्य झाला. चाबूक यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.