Kolhapur Ratnagiri Highway | कोल्हापूर–रत्नागिरी चार पदरी महामार्ग पुढच्या काही महिन्यात पूर्ण होणार - नितीन गडकरी  

जमीन संपादन व काही परवानग्यांमुळे उर्वरित कामाला विलंब झाला असल्याची माहिती
Nitin Gadkari
Kolhapur Ratnagiri Highway | कोल्हापूर–रत्नागिरी चार पदरी महामार्ग पुढच्या काही महिन्यात पूर्ण होणार - नितीन गडकरी  File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: कोल्हापूर–रत्नागिरी चार पदरी महामार्गाच्या विविध टप्प्यांमध्ये बरेच काम पूर्ण झाले असून जमीन संपादन व काही परवानग्यांमुळे उर्वरित कामाला विलंब झाला आहे. या अडचणी दूर झाल्यानंतर पुढील काही महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली.

राज्यसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर ते रत्नागिरी या १५० किलोमीटरच्या महामार्गाच्या चार पदरी प्रकल्पाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. रत्नागिरीजवळील हातखंबा भागात कामाची गती मंद असल्याचे सांगत प्रकल्प पूर्ण होण्याच्या कालावधीबाबतही त्यांनी माहिती मागितली. यावर उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, राऊत यांनी उल्लेख केलेले हातखंबा जंक्शन मुंबई गोवा महामार्गाववरील महत्त्वाचे ठिकाण आहे. १९९५ ते २००० या काळात मंत्री असताना या भागात मोठ्या प्रमाणात अपघात होत होते आणि जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी तातडीची परिस्थिती लक्षात घेऊन २४ तासांत दुरुस्तीचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Nitin Gadkari
Kolhapur Ratnagiri Highway | कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर तीन अतिरिक्त पादचारी उड्डाणपूल

दरम्यान, नितीन गडकरी यांनी कोल्हापूर - रत्नागिरी प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती देताना सांगितले की, या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची किंमत सुमारे १०३२ कोटी रुपये असून या भागातील ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसरा टप्पा ४२.२ किलोमीटरचा असून त्याची किंमत २१०४ कोटी रुपये आहे आणि त्यातील सुमारे ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. तिसरा टप्पा ३२.९६ किलोमीटरचा असून त्याची किंमत २०५६ कोटी रुपये आहे. या टप्प्यातील सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी जमीन संपादनाची प्रक्रिया आणि वन विभागाच्या परवानग्यांमुळे कामाला विलंब झाला आहे. जमीन संपादन हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येते आणि जमीन उपलब्ध झाल्यानंतर उर्वरित काम चार ते सहा महिन्यांत पूर्ण करता येईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर–रत्नागिरी महामार्ग हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून गोवा तसेच देशातील इतर भागांशी संपर्कासाठीही तो उपयुक्त आहे. त्यामुळे प्रकल्पाचे उर्वरित काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news