

कोल्हापूर : कोल्हापूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गात अनेक ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाची मागणी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केली आहे. या रस्त्यासाठी आता तीन पादचारी उड्डाणपूल, 12 कि.मी. सेवा मार्ग, दोन व्हेईकल अंडरपास, दोन हलक्या वाहनांसाठी अंडरपास तयार करण्यास मान्यता दिली आहे. ही सर्व कामे सुरू केली आहेत.
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी गावाची सिमा, गावांचे प्रवेशद्वार आणि इतर ठिकाणी नागरिकांसाठी पादचारी उड्डाणपूल नसल्याने नागरिकांनी आंदोलन केले होते, तर अनेक ठिकाणी वाहनांना लांब अंतरावरून फेरा मारून मागे वळून यावे लागण्याची शक्यता होती. या सर्व अडचणी जिल्हाधिकारी अमोल येडगे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासमोर गावकर्यांनी मांडल्या. प्रशासकीय यंत्रणेने ही बाब केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडून वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने याला मंजुरी दिली.
नव्याने मंजूर झालेली बहुतांश कामे सुरू झाली असून, काही कामे पूर्णत्वास आली आहेत. पैजारवाडी ते चोकाक या मार्गावर नावली, आंबेवाडी आणि हेर्ले या तीन ठिकाणी पादचारी उड्डाणपुलाची कामे सुरू झाली असून, काही कामे पूर्णत्वास आली आहेत, तर पडवळवाडी फाटा आणि केर्ले हायस्कूल या दोन ठिकाणी बॉक्स टाईप स्ट्रक्चर तयार करण्यात आली आहेत. केर्ली आणि कुशिरे-निगवे या दोन ठिकाणी वाहनांसाठी भुयारी मार्ग तयार केला जात असून, काम अंतिम टप्प्यात आहे. भुयेवाडी आणि भुये या दोन ठिकाणी हलक्या वाहनांसाठी भुयारी रस्ता तयार केला जात असून, याचेही काम पूर्णत्वास येत आहे. याबरोबर या मार्गावर सेवा मार्गासाठी नागरिकांंनी आग्रह धरला होता. गावांजवळून महामार्ग जात असल्याने सेवामार्ग करून अपघातापासून संरक्षण करा, अशी मागणी होती. ही मागणीही मान्य झाली आहे. पैजारवाडी ते चोकाक या मार्गावर एकूण सुमारे 12 किलोमीटरचे सेवा मार्ग मंजूर झाले असून, काम युद्धपातळीवर सुरू आहे. पडवळवाडी ते जठारवाडी या मार्गावर पडवळवाडी परिसरात दोन ठिकाणी, केर्ली गावात दोन ठिकाणी, जोतिबा येथील वाहनांसाठीच्या भुयारी मार्गाजवळ, कुशिरे येथील भुयारी मार्गाजवळ, भुयेवाडी येथील भुयारीमार्गाजवळ, भुये भुयारीमार्गाजवळ, जठारवाडी या ठिकाणी सेवा मार्ग तयार केले आहेत.