

मुंबई : ‘पैसे द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील...’ काही वर्षांपूर्वी खंडणीखोरांचा फोन आला की, त्यामागे टोळी, स्थानिक गुंड किंवा कुख्यात गुन्हेगार असल्याचे चित्र समोर यायचे. खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी ठरावीक ठिकाण, मध्यस्थ आणि प्रत्यक्ष भेटी अशी पारंपरिक पद्धत होती. मात्र, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबत खंडणीचा चेहराही बदलला आहे. फोन कॉलपासून सोशल मीडिया, व्हॉटस्ॲप, बनावट प्रोफाईल, डिजिटल धमक्या व ऑनलाईन पेमेंटपर्यंत गुन्हेगारांनी मजल मारली आहे. विशेष म्हणजे, स्वतःचे बँक खाते न वापरता ‘मनी म्यूल’ खात्यांच्या माध्यमातून रक्कम फिरवण्याची पद्धत तपास यंत्रणांसाठी नवे आव्हान ठरत आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत गंभीर खंडणी प्रकरणांच्या तपासासाठी खंडणीविरोधी पथक कार्यरत आहे. संघटित गुन्हेगारीशी संबंधित खंडणीचे कॉल, धमक्या आणि वसुलीचा तपास करण्यासोबतच गुन्हेगारांच्या नेटवर्कचा शोध घेण्याचे काम या पथकाकडून केले जाते. ऑनलाईन गुन्ह्यांच्या तपासात सायबर पोलिसांचीही महत्त्वाची भूमिका असते.
सोशल मीडियावरून आधी ‘रेकी’
व्यक्तीचा व्यवसाय, कुटुंबातील सदस्य, आर्थिक व्यवहार, राहण्याचे ठिकाण, ये-जा करण्याची ठिकाणे आदी माहिती सोशल मीडिया पोस्ट, छायाचित्रे आणि अन्य डिजिटल माध्यमांतून गोळा केली जाते. त्यानंतर फोन, मेसेज किंवा सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून धमकी दिली जाते. सप्टेंबर २०२६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वांद्रे येथील माजी आमदार झिशान सिद्दिकी आणि त्यांच्या बहिणीला आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल तसेच सोशल मीडिया संदेशाद्वारे धमक्या आल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडून तपास करण्यात आला.
‘कॅश’ऐवजी डिजिटल पेमेंट
यूपीआय क्यूआर कोड, बँक खाते, डिजिटल वॉलेट किंवा अन्य माध्यमांतून रक्कम स्वीकारली जाते. त्यानंतर काही वेळातच ती दुसऱ्या खात्यात वळवली जाते. यामध्ये ‘मनी म्यूल’ खात्यांचा वापर तपासासाठी मोठे आव्हान ठरतो. गुन्हेगार स्वतःचे खाते न वापरता अन्य व्यक्तींच्या खात्यात रक्कम जमा करतात. पुढे ही रक्कम अनेक खात्यांमध्ये फिरवली जाते किंवा रोख स्वरूपात काढली जाते. त्यामुळे तपास यंत्रणांना केवळ पैसे ज्या खात्यात जमा झाले तेवढ्यावर न थांबता संपूर्ण आर्थिक व्यवहाराची साखळी तपासावी लागते.
कर्जाच्या नावाखाली डिजिटल खंडणी
ऑनलाईन कर्ज अॅपच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांनी खंडणीचे आणखी एक धोकादायक रूप समोर आणले आहे. २०२६ मध्ये मुंबई गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या एका प्रकरणात ऑनलाईन अॅपद्वारे कर्ज घेतल्यानंतर आरोपींनी एपीके फाईलच्या माध्यमातून मोबाईलमधील माहिती मिळवल्याचा आरोप होता. त्यानंतर पीडित व त्याच्या कुटुंबीयांना धमकावत अनेक कर्जे घेण्यास भाग पाडल्याचे तपासात समोर आले.
भीतीपोटी पैसे देऊ नका
खंडणीची मागणी झाल्यास घाबरून तातडीने पैसे देऊ नयेत. धमकीचा कॉल, मेसेज, मोबाईल क्रमांक, सोशल मीडिया प्रोफाईल, क्यूआर कोड किंवा बँक खात्याची माहिती नष्ट न करता जतन करावी. तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर त्वरित संपर्क करणे महत्त्वाचे आहे.