‘पंचगंगेच्या हक्का’साठी पुढाकाराची गरज

‘पंचगंगेच्या हक्का’साठी पुढाकाराची गरज
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : प्रदूषणाची असंख्य कारणे सोबत घेत पंचगंगा वाहत आहे. दररोज हजारो लिटर सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यामुळे पंचगंगेचा प्रदूषणाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. यंदाच्या जागतिक नदी दिनाची थीम 'नद्यांचे हक्क' अशी असून जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या पंचगंगेच्या प्रदूषणाची दाहकता कमी करत तिला मरणासन्न अवस्थेतून बाहेर काढून तिला तिचा हक्क मिळवून देण्यासाठी आता कोल्हापूरकरांनीच पुढे येण्याची गरज आहे.

पंचगंगा घाटावरून शेकडो लिटर मैलामिश्रित सांडपाणी आजही नाल्यांमधून थेट नदीपात्रात मिसळत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करूनही हे नाले थेट नदीत मिसळतच आहेत. महापालिकेच्या 103 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित 17 एमएलडी सांडपाणी निर्जंतुकीकरण करून नदीपात्रात सोडले जाते.

कोल्हापूर, इचलकरंजी या शहरांसह जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांचे सांडपाणी, औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या पंचगंगेत मिसळत आहे.

जागतिक नदी दिन

जलस्रोतांबाबत जनजागृती करण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी जागतिक नदी दिन साजरा केला जातो. नद्यांवर आलेल्या संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा होतो. 'नद्यांचे हक्क' ही यंदाच्या जागतिक नदी दिनाची थीम आहे.

प्रदूषण सुरू, आंदोलन सुरू, कारवायाही सुरूच

पंचगंगेच्या प्रदूषणप्रकरणी 1997 सालापासून कारवाया सुरू आहेत. प्रदूषणप्रकरणी कोल्हापूर महानगर पालिकेला शेकडो वेळेला नोटिसा देण्यात आल्या, फौजदारी खटले झाले, लाखो रुपयांची बँक हमी जप्ती झाली, अनेक वेळा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला; मात्र आजही पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न 'जैसे थे' आहे. यामुळे आता नदीचे प्रदूषण सुरू, आंदोलन सुरू, कारवायाही सुरूच असे म्हणण्याची वेळ आली आहे.

माशांच्या प्रजाती होत आहेत नामशेष

नदीमध्ये 71 प्रकारच्या माशांच्या प्रजाती आढळत होत्या. मात्र, प्रदूषणाचा गंभीर परिणाम जलचरांवर होत आहे. प्रदूषणामुळे पूर्वी आढळणारे पाण मांजर आता नामशेष होत आहे. सध्या 71 प्रजातींपैकी केवळ 31 प्रजाती आढळतात, यातील तब्बल 40 प्रजाती नामशेष झाल्या आहे

इतके तयार होते सांडपाणी

* कोल्हापूर महानगरपालिका – 5 ते 7 एमएलडी
* इचलकरंजी महानगरपालिका – 20 ते 22 एमएलडी
* ग्रामपंचायती – 37 एमएलडी
* औद्यागिक वसाहती – 9 एमलडी
* पंचगंगेच्या काठावरील ग्रा.पं. – 39 एमएलडी
* लक्ष्मी औद्योगिक 1 ते 1.5 एमएलडी
* इचलकरंजी औद्योगिक क्षेत्र 9 ते 12 एमएलडी

प्रक्रिया होणारे सांडपाणी

* कोल्हापूर महानगरपालिकेच्या 120 एमएलडी पैकी 103 एमएलडी
* इचलकरंजी 42 एमएलडी पैकी 20 एमएलडी
* नदीकाठची गावे 39 एमएलडीपैकी 37 एमएलडीवर केवळ निर्जंतुकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news