

Nandani Math Madhuri elephant returning
जयसिंगपूर : माधुरी हत्ती नांदणी मठाकडे पाठविण्यासंदर्भात उच्च स्तरीय समितीने निर्णय घेण्यासंदर्भातचा निर्णय आज (दि.१२) सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व मठाकडून करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर देण्यात आला. यामुळे उच्च स्तरीय समितीकडे नांदणी मठाकडून अर्ज करून लवकरच माधुरी हत्ती परत आणणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात माधुरी हत्तीसंदर्भात न्यायमुर्ती जे. बी. पारडीवाला यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयासमोर राज्य सरकारचे वकील ॲड. धर्माधिकारी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून माधुरी हत्तीला वनतारा येथे पाठविण्यात आले आहे. तथापी राज्यामध्ये कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य सरकारने वनतारा आणि नांदणी मठाशी समन्वय साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करून नांदणी मठाच्या स्वत:च्या जागेमध्ये वनताराच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत हत्ती पुनर्वसन केंद्र तातडीने उभा करून त्याठिकाणीच माधुरीवर पुढील उपचार करण्याचे ठरलेले आहे.
यावेळी पेटाच्या वकिलांनी माधुरी हत्तीची तब्येत खराब असल्याचे नमूद करून सध्या नांदणी मठामध्ये कोणत्याच सुविधा नाहीत, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस न्यायालयानेही उपलब्ध कागपत्रानुसार माधुरी हत्तीची तब्येत खराब असल्याचे मत व्यक्त करून मग तुम्ही माधुरीवर उपचार कसे करणार? असा प्रश्न उपस्थित केला.
याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, वनताराच्यावतीने सातत्याने माधुरी किती आनंदीत व तब्येत चांगली झाली असल्याचे व्हिडिओ वारंवार समाज माध्यमांवर सादर केलेले आहेत. यामुळे पेटाकडून हेतु पुरस्कर खोटा प्रसार केला जात आहे. सुनावणीस उपस्थित वनताराच्या वकीलांनी युध्दपातळीवर तातडीने नांदणी येथे पुनर्वसन केंद्रांचे उभारणी करून उच्च स्तरीय समितीच्या देखरेखेखाली त्याठिकाणी माधुरीची सर्व काळजी घेणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नेमकी उच्च स्तरीय समितीची कार्यकक्षा काय आहे, अशी विचारणा केली. तेंव्हा राज्य सरकारच्या वकिलांनी देशातील पाळीव हत्तीच्या संदर्भात देखरेख करणारी ही समिती असल्याची सांगितले. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च स्तरीय समितीने माधुरीच्या हत्तीबाबत सर्व निर्णय घ्यावा असे निर्देश दिले. यावेळी ॲड. सुंधांशू चौधरी, ॲड. आनंद लांडगे, ॲड. योगेश पांडे, सुदीप जैन, विशाल नेहरा आदी सुनावणी दरम्यान उपस्थित होते.