

Madhuri Elephant News
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथल्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणी संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. माधुरी हत्तीणी संदर्भात नांदणी मठ, वनतारा आणि राज्य शासन न्यायालयात तूर्त पुनर्विचार याचिका दाखल करण्यास घाई करणार नसल्याचे समजते. त्याआधी तूर्तास धार्मिक कार्यक्रमांसाठी माधुरी हत्तीणीला कोल्हापूरला पाठवण्यासाठी नांदणी मठाकडून अर्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माहिती दिली आहे.
न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार नाही असे काही नाही. त्यात काही त्रुटी राहू नयेत. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करुन राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठाचे वकील सखोल माहिती घेऊन याचिका दाखल करतील. जेणेकरुन न्यायालयाकडून याचिका फेटाळली जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल. यामुळे याचिका दाखल करण्यास वेळ घेतला जात असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
नांदणी मठात १८ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान चातुर्मास धार्मिक कार्यक्रम होत आहेत. उच्चाधिकार समितीने जेव्हा माधुरी हत्तीण वनतारामध्ये पाठवण्याचा आदेश दिला तेव्हा त्यातील परिच्छेद ११० मध्ये नमूद केले होते की धार्मिक कार्यक्रमासाठी हत्तीणीला पुन्हा मठात आणण्याची मूभा मठाला राहील. त्याआधारे आमचे वकील १८ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या चातुर्मासासाठी तात्पुरत्या स्वरुपात हत्तीणीला कोल्हापूरला पाठवावे. त्यानंतर कायमस्वरुपी हत्तीण येथे राहावी आणि तिच्यावर उपचार करावेत यासाठी याचिका दाखल केली जाईल, अशी भूमिका मठाने घेतली आहे. त्यासाठी अर्ज करणार असल्याचे ठरले आहे, असे शेट्टी म्हणाले.