

Nagpur Ratnagiri Highway Accident
शिरोली पुलाची : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शिये फाटा क्रशर लाईन येथे भरधाव हायवा डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात भुये (ता. करवीर) येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राहुल ऊर्फ बंडा रामचंद्र शिंदे (वय ३६, रा. भुये) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी (दि. २४) सकाळी सव्वाआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे भुये गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शिंदे हे शिरोली औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत कामाला होते. मंगळवारी सकाळी ते आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच ०९ बीडब्ल्यू २०५३) कामावर जाण्यासाठी शिरोली एमआयडीसीच्या दिशेने निघाले होते. शिये फाटा मार्गावरील पूजा चौगुले यांच्या पंचधारा महिला खाणमजूर व औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, टोप या खाणीजवळ मागून डबर भरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने (क्र. केएल २४ एफ ६३५२) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, डंपरचे चाक राहुल यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर दुचाकी डंपरच्या पुढील भागात अडकली आणि सुमारे १५ ते २० फूट फरफटत गेली. या अपघातप्रकरणी दीपक भालचंद्र पाटील (वय ४३, रा. भुये) यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपरचालक कृष्णात विलास पोवार (रा. गंगारामनगर, टोप) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एन. एस. शेख करीत आहेत.
दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले
राहुल शिंदे हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असून, त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. मोठी मुलगी पहिलीच्या वर्गात, तर लहान मुलगी अंगणवाडीत शिकत आहे. खासगी कंपनीत नोकरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.