Waghapur Nagpanchami | वाघापूरमध्ये नागपंचमीला लाखो भाविकांची मांदियाळी

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पहाटे महापूजा; दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा
Waghapur Nagpanchami  Yatra
वाघापूर : येथील जोतिर्लिंग मंदिरात महापूजा व महाआरती करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर व पदाधिकारी तसेच यात्रेस झालेली गर्दी.Pudhari
Published on
Updated on

Waghapur Nagpanchami Yatra

मुदाळ तिट्टा : महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर (ता. भुदरगड) येथील नागदैवत जोतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. पहाटेपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. दुपारनंतर गर्दीने उच्चांक गाठल्याने दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

‘जोतिबाच्या नावाने चांगभलं’च्या जयघोषात पहाटे पाच वाजता काकड आरती, महापूजा आणि अभिषेक करण्यात आला. राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महापूजा व अभिषेक विधी पार पडला. वाघापूरचे नागदैवत जोतिर्लिंग देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असल्याने नागपंचमीच्या यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व आहे.

Waghapur Nagpanchami  Yatra
Pune Nagpanchami Celebration: पुण्यात नागपंचमीचा भक्तिमय जल्लोष; शिवमंदिरांत रुद्राभिषेक, महापूजेसह विविध धार्मिक कार्यक्रम

मानाचा चिखली गणपती सकाळी सात वाजता मिरवणुकीने मंदिरात दाखल झाला. त्यानंतर भाविकांनी जोतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. भाविकांकडून लाह्या, तांदूळ आणि शेंगा यांचा प्रसाद देवाला अर्पण करण्यात येत होता. पहाटेपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी दुपारी बारानंतर अधिक वाढली.

पावसातही भाविकांचा उत्साह कायम

यात्रेदरम्यान सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून लख्ख ऊनही पडत होते. बदलत्या आणि प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रेला हजेरी लावली. मंदिराकडे जाणाऱ्या सुमारे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा विविध दुकाने थाटण्यात आली होती. खाद्यपदार्थ, खेळणी, पेढे तसेच विविध वस्तूंच्या दुकानांमुळे संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

Waghapur Nagpanchami  Yatra
Nagpanchami Special : नवसाला पावणारा नागझरीचा नागोबा

वाहतुकीसाठी विशेष नियोजन

यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले होते. गारगोटी बसस्थानकातून प्रवाशांसाठी एसटी बसची विविध मार्गांवर व्यवस्था करण्यात आली होती. तसेच वाघापूर-आदमापूर-मुदाळतिट्टा-कुर असा एकेरी वाहतुकीचा मार्ग लागू करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी टाळण्यात यश आले.

यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी समन्वयाने काम केले. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.

Waghapur Nagpanchami  Yatra
Naugpanchami Snake Rescue: गारुड्यांची पेटारी गेली; सर्पमित्रांची रेस्क्यू बॅग आली! नागपंचमीच्या परंपरेत मोठा बदल

पोलिसांचा कडक बंदोबस्त

यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरासह प्रमुख मार्गांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसीलदार अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक मुल्ला आणि पोलीस प्रशासनाने देवस्थान समिती व ग्रामपंचायतीला आवश्यक सूचना दिल्या होत्या. गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली.

मान्यवरांची यात्रेला भेट

माजी आमदार तथा बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, माजी उपसभापती सत्यजित जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यात्रेला भेट देऊन दर्शन घेतले.

Waghapur Nagpanchami  Yatra
नागपंचमी : शेतकऱ्याच्या जीवनातील नागपंचमीचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या अधिक

दरम्यान, जोतिर्लिंग मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून आमदार प्रकाश आबिटकर यांच्या निधीतून ऐतिहासिक ठेवणीचे मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. मंदिराच्या या कामामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

यात्रा यशस्वी करण्यासाठी स्थानिक उपसमितीचे सदस्य, पोलीस पाटील, देवस्थान मंडळाचे सर्व सदस्य, विविध तरुण मंडळे आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. प्रशासन आणि ग्रामस्थांच्या योग्य नियोजनामुळे नागपंचमीची यात्रा उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि सुरळीतपणे पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news