सदर बाजार येथील मशीद ट्रस्ट अध्यक्षांसह बंधूवर खुनीहल्ला

सदर बाजार येथील मशीद ट्रस्ट अध्यक्षांसह बंधूवर खुनीहल्ला
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सदर बाजार येथील सुन्नत जमान मशिदीवरील वर्चस्वातून दोन गटांत धुमसत असलेल्या वादातून शनिवारी दुपारी भरचौकात झालेल्या तलवार हल्ल्यात मशीद ट्रस्ट अध्यक्षांसह त्यांचे बंधू गंभीर जखमी झाले. मेहमूदखान तोताखान पठाण (वय 62), नासर तोताखान पठाण (58, रा. सदर बाजार) अशी जखमींची नावे आहेत. मुख्य संशयितासह 6 जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयित पसार झाले आहेत.

अझहर दस्तगीर फकीर (48), आरिफ ताजुद्दीन शेख, यासीर ईलाही अत्तार, गुलमहम्मद गफार शेख, दिनमहम्मद गफार शेख, आय्याज दस्तगीर फकीर (सर्व रा. सदर बाजार) अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. सदर बाजार परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुन्नत जमान मशीद परिसरासह चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

जखमी मेहमूदखान पठाण यांच्या शरीरावर तलवारीचे 19 वर्मी वार झाल्याने प्रकृती चिंताजनक बनली आहे. बंधू नासर पठाण यांना खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. भरचौकात आणि प्रचंड वर्दळ असलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, सदर बाजार येथील सुन्नत जमान मशीद ट्रस्टच्या वर्चस्वातून दोन गटांत काही वर्षांपासून वाद सुरू आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष मेहमूदखान पठाण यांच्यासह त्यांचे संचालक मंडळ 25 वर्षांपासून ट्रस्टवर कार्यरत आहे. संबंधित ट्रस्टचे अध्यक्ष व संचालक मंडळ बरखास्त करून नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यासाठी संशयित अझहर फकीरसह समर्थकांचा तगादा सुरू होता. या कारणातून दोन गटांत वारंवार वाद होत होते.

शुक्रवारी दुपारी मशिदीच्या नोटीस फलकावर ट्रस्टच्या निवडीसाठी सायंकाळी मिटिंग बोलावल्याचा मजकूर विरोधी गटाच्या वतीने लिहिण्यात आला होता. या कारणातून पुन्हा वादावादी होऊन हे प्रकरण शाहूपुरी पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते.

पोलिस निरीक्षक सिंदकर यांनी दोन्हीही गटांतील प्रमुखांची रात्री पोलिस ठाण्यात बैठक घेऊन त्यांच्यावर प्रतिबंध कारवाईच्या नोटिसा बजावल्या होत्या. कायदेशीर कारवाईचाही त्यांनी इशारा दिला होता.

भरचौकात सख्ख्या भावांवर खुनीहल्ला

शनिवारी दुपारी मेहमूदखान पठाण हे प्रार्थनेसाठी मोपेडवरून मशिदीकडे जात असताना भरचौकातील रिक्षा थांब्याजवळ दबा धरून बसलेल्या अझहरसह आरिफ शेख, यासीर अत्तार यांनी मोपेड रोखून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. पाठोपाठ वार झाल्याने मेहमूदखान बचावासाठी ओरडत होते. भावावर हल्ला होत असल्याचे पाहून नासर पठाण पुढे सरसावले. मुख्य संशयितासह अन्य हल्लेखोरांनी त्यांच्यावरही तलवारीने हल्ला केला. रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत असतानाही हल्लेखोरांकडून तलवारीचे वार सुरूच होते.
काही नागरिकांनी हल्लेखोरांच्या हातातील तलवारी काढून घेऊन जखमींना रिक्षातून शासकीय रुग्णालयाकडे पाठविले. या घटनेमुळे चौकात बघ्यांची मोठी गर्दी झाली. तलवारीसह हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. पठाण बंधूंवर हल्ला झाल्याची माहिती होताच कुटुंबीय, नातेवाईकांसह नागरिकांनी घटनास्थळ व शासकीय रुग्णालय आवारात मोठी गर्दी केली.

सीसीटीव्ही फुटेज हस्तगत

जीवघेण्या हल्ल्याचे चौकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले आहे. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news