

हातकणंगले, पुढारी वृतसेवा : आर्थिक कारणातून झालेल्या बाचाबाचीतून कोयत्याने सपासप वार करून रामचंद्र तुकाराम खिल्लारी (27 रा. लक्ष्मी औद्योगिक वसाहत, हातकणंगले) याचा खून करण्यात आला. हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये भरदिवसा ही घटना घडली.
या प्रकरणी बाळू विनोद जाधव (17, रा. लक्ष्मी औद्योगिक वसाहत, हातकणंगले) व कपील बजरंग जाधव (20, रा. राजमाने हायस्कूलजवळ) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील वेद इंडस्ट्रीमध्ये रामचंद्र खिल्लारी व बाळू जाधव हे दोघे काम करत होते. सोमवारी सकाळी खिल्लारी व संशयित जाधव यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाला. या वादात खिल्लारीने जाधव याला काठीने मारहाण केली होती.
जाधव याने आपला भाऊ कपिल जाधव याला बोलावून घेतले. या दोघांनी खिल्लारीला जाब विचारला. या वेळी खिल्लारी याने जाधव याला मारहाण केली आणि चाकू घेऊन अंगावर धावून गेला. त्याचवेळी जाधव याने आपल्या घरातील कोयता आणून खिल्लारीच्या गळ्यावर डोक्यावर पाठीत सात ते आठ वार करून गंभीर जखमी केले. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक महादेव तोंदले अधिक तपास करत आहेत.