कोल्हापूर : पाण्याच्या टाकीत बुडवून बालिकेचा अमानुष खून

कोल्हापूर : पाण्याच्या टाकीत बुडवून बालिकेचा अमानुष खून
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : किरकोळ वादातून अडीच वर्षांच्या कार्तिकी गणेश गटे (रा. बालिंगा पाडळी, ता. करवीर, मूळ गाव लोणी, जि. अहमदनगर) या बालिकेचे भरदिवसा भवानी मंडप परिसरातून अपहरण करून रंकाळा टॉवर परिसरात पाण्याच्या टाकीत बुडवून तिचा अमानुष खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री उघडकीला आली. याप्रकरणी क्रूरकर्मा राजू विश्वजित मंडल ऊर्फ राजू बिहारी (वय 20) या फिरस्त्याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे.

या नराधमाने बालिकेचा निर्घृण खून केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर वीटभट्टी कामगार असलेल्या दाम्पत्याने घटनास्थळी व शासकीय रुग्णालयात केलेला आक्रोश काळीज हेलावणारा होता. भवानी मंडपातील सीसीटीव्ही फुटेजमुळे काही तासांत खुनाचा तपास लागला.

पोलिसांनी शोधमोहीम राबवून फिरस्त्याला जेरबंद केले. संशयिताने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. संशयिताला मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी 5 दिवसांची पोलिस कोठडी दिली.

मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील गणेश भाऊसाहेब गटे व त्यांची पत्नी पूजा हे दाम्पत्य मुलगी कार्तिकी व एक वर्षाच्या मुलासमवेत रोजगारासाठी एक वर्षापूर्वी कोल्हापुरात आले. ते बालिंगा पाडळी (ता. करवीर) येथील वीटभट्टीवर काम करतात.

पश्चिम बंगालमधील राजू विश्वजित मंडल ऊर्फ राजू बिहारी (रा. बिबिघाट नथपाडा, ता. समुत्रा, जि. वर्धमान) हा फिरस्ताही तेथील वीटभट्टीवर काम करतो. त्यामुळे गटे दाम्पत्याची त्याच्याशी ओळख आहे.

शिवीगाळ केल्याने बघून घेण्याची धमकी

राजू बिहारी फिरस्ता असल्याने काम संपवून तोे कोठेही राहतो. बसस्थानक, मंदिर परिसर, रेल्वेस्थानक आवारात त्याचा वावर असतो. दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणातून गटे व बिहारीमध्ये वादावादी झाली. गटे दाम्पत्याने बिहारीला शिवीगाळ केल्याने त्याने बघून घेण्याची धमकी देऊन तो बुधवारी सायंकाळपासून बालिंगा पाडळी येथून पसार झाला होता.

भवानी मंडपातून भरदिवसा मुलीचे अपहरण

गुरुवारी सकाळपासून संशयित गटे दाम्पत्याच्या मागावर होता. वीटभट्टीवरील काम लवकर आवरून गणेश, त्याची पत्नी पूजा दोन लहान मुलांसमवेत गुरुवारी (दि. 18) दुपारी भवानी मंडप येथे आले. दोन्हीही मुले भवानी मंडपात खेळत असताना दाम्पत्याची नजर चुकवून नराधमाने कार्तिकीचे भरदिवसा अपहरण केले. काही काळानंतर मुलगी गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर दाम्पत्याने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांची शोध पथके रवाना

पोलिस निरीक्षक सतीश गुरव, उपनिरीक्षक संदीप जाधव, प्रीतमकुमार पुजारी, अनिल ढवळे, प्रशांत घोलपसह डीबीच्या पथकाने मुलीचा शोध सुरू केला. ठिकठिकाणी पथके रवाना करूनही बालिकेचा शोध लागला नाही.

अपहरणाचे सीसीटीव्ही फुटेज

पोलिसांनी भवानी मंडप परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये संशयित तरुण कार्तिकीला घेऊन जात असल्याचे दिसले. हे फुटेज पाहून गटे दाम्पत्याने राजू बिहारीला ओळखले. त्याचा शोध सुरू झाला. गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्याने तोंड उघडले

पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडले. मुलीच्या आई, वडिलांनी कामावर शिवीगाळ केल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी कार्तिकीचे अपहरण करून तिचा खून केल्याची त्याने कबुली दिली. भवानी मंडपातून मुलीचे अपहरण करून तिला डी मार्ट, रंकाळा टॉवर परिसरात नेले. त्या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळील पाण्याच्या टाकीत कार्तिकीला टाकून खून केल्याचे त्याने सांगितले.

अधिकार्‍यांसह पोलिसही गहिरवले

पोलिसांनी मध्यरात्री अडीच वाजता घटनास्थळी जाऊन शोध घेतला असता, पाण्याच्या टाकीत बालिकेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहून अधिकार्‍यांसह पोलिसही गहिवरले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news