

कोल्हापूर; सतीश सरीकर : प्रशासनाने विभागप्रमुखांकडून अहवाल मागविल्याने महापालिकेत बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. सन 2018 सालापासून बदल्या झाल्या नसल्याने आणि प्रशासनानेही मार्च एंडनंतरचे आश्वासन दिल्याने महापालिकेतील कर्मचार्यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. अनेकांनी मर्जीतील अधिकार्यांकडून आतापासूनच 'फिल्डिंग' लावली आहे. मलईदार टेबलवर कर्मचार्यांचा डोळा आहे. अधिकार्यांनीही मिळवून देणार्या आपल्या खास माणसांना विभागात घेण्यासाठी जोडणा केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने थेट नागरिकांशी संबंधित महापालिकेचा कारभार. साहजिकच, इतर सरकारी कार्यालयांनुसारच महापालिकेतही फाईलवर वजन ठेवल्याशिवाय ती पुढे सरकत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. मात्र, ठराविक विभागांतच ही स्थिती आहे. परिणामी, या ठिकाणी वर्णी लागण्यासाठी अनेकांची धडपड असते. अशाच प्रकारे चिकटलेले कर्मचारी अनेक वर्षे मलईदार खुर्चीवर ठाण मांडून आहेत. इतर विभागांत जाण्यासाठी ते अजिबात तयार नसल्याचे चित्र आहे. शासन नियमानुसार कर्मचार्यांची तीन वर्षांनंतर बदली होणे अपेक्षित आहे.
यापूर्वी 2018 मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबविली होती. प्रत्येक कर्मचार्याला तीन विभागांचे पर्याय दिले होते. त्यानुसार संबंधित विभागातील मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन बदल्या करण्यात आल्या होत्या. एकाच विभागात तीन वर्षे पूर्ण झालेल्या 120 कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या होत्या. यात क्लार्क, वरिष्ठ लिपिक, सहायक अधीक्षक, अधीक्षक आदींचा समावेश होता. दोन-अडीच वर्षे सेवा झालेल्या कर्मचार्यांचा बदल्यांत समावेश नव्हता. त्यानंतर बदल्या रखडल्या. आता अशा कर्मचार्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बदल्यांसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी पात्र आहेत. परिणामी, महापालिकेत बदल्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
पवडी : १७६
आरोग्य : २८०
चालक : १३
पाणीपुरवठा : १४१
मार्चमधील वसुलीमुळे बदल्या झाल्या नव्हत्या. बदल्यांसाठी आता महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांकडून अहवाल मागविले आहेत. सर्व विभागप्रमुखांकडून आलेले अहवाल प्रशासनाकडे पाठविण्यात येतील.
– तेजश्री शिंदे, कामगार अधिकारी, महापालिका
शासन निर्णयानुसार तीन वर्षांतून बदली होणे क्रमप्राप्त आहे. परंतु, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बदल्या झालेल्या नाहीत. गेल्यावर्षी बदली धोरण जाहीर होऊनही पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. रिक्त जागांवर हंगामी कर्मचार्यांतून जागा भरल्यास ते कर्मचारी घरफाळा सर्व्हेसाठी वापरता येतील. जेणेकरून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल.
– अजित तिवले, जनरल सेक्रेटरी, महापालिका कर्मचारी संघ