

Shirol Monitor Lizard Rescue
कवठेगुलंद : औरवाड (ता. शिरोळ) येथील राजू दुग्गे यांच्या घरात सुमारे ४ फूट लांबीची दुर्मिळ घोरपड आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. औरवाड परिसरात अशा प्रकारची घोरपड आढळण्याची ही पहिलीच घटना आहे. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र अवधूत रावण यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून या घोरपडीला सुरक्षितरीत्या पकडले.
औरवाड व आसपासच्या परिसरात नेहमीच दुर्मिळ प्रजातींचे साप आणि सरपटणारे प्राणी आढळून येतात. सर्पमित्र अवधूत रावण हे अशा प्राण्यांना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. आतापर्यंत त्यांनी शेकडो सरपटणाऱ्या प्राण्यांना सुरक्षित जीवदान दिले आहे. या मोहिमेतही त्यांनी घोरपडीला कोणतीही इजा न पोहोचवता यशस्वीरीत्या पकडून नैसर्गिक आधिवासात मुक्त केले.
घोरपड हा अत्यंत शांत व निरुपद्रवी प्राणी असून तो मानवासाठी सापासारखा धोकादायक नसतो. उंदीर आणि पिकांचे नुकसान करणारे कीटक खाऊन घोरपड शेतीचे व पर्यावरणाचे रक्षण करते; म्हणूनच तिला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते. मात्र, घोरपडीचे मांस खाल्ल्याने किंवा तिच्या चरबीच्या तेलाने ताकद वाढते, सांधेदुखी व कंबरदुखी बरी होते, अशा अंधश्रद्धा आणि गैरसमजांमुळे या प्राण्याची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. परिणामी, हा दुर्मिळ प्राणी सध्या अस्तित्वाच्या संकटात सापडला आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी कुरुंदवाड येथील एका माजी नगरसेवकाच्या गाडीतही घोरपड आढळली होती. ती घोरपड नेमकी कुठून आली आणि कशासाठी आणली गेली होती, याचा सुगावा वन विभागाला अद्यापही लागलेला नाही. पर्यावरणप्रेमींनी अशा वन्यजीवांचे रक्षण करण्याचे आणि अंधश्रद्धांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.