

कोल्हापूर : मनकर्णिका कुंडाचा ऐतिहासिक ठेवा भाविकांसाठी लवकरात लवकर खुला करा, संवर्धनाचे काम शास्त्रोक्त आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी रविवारी दिल्या.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील प्राचीन मनकर्णिका कुंडाच्या सुरू असलेल्या उत्खनन व संवर्धन कामाची पाहणी केली.
मनकर्णिका कुंडाचे काम गतीने पूर्ण करून हा ऐतिहासिक वारसा भाविकांसाठी खुला करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. संवर्धन करताना ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व जपून कामाचा दर्जा कायम ठेवावा, अशा सूचना क्षीरसागर यांनी देवस्थान समितीचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांना दिल्या. मनकर्णिका कुंडाचा ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच या परिसराचा विकास भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या ठिकाणाच्या स्वरूपात करावा. त्यासाठी आवश्यक नियोजन करून संवर्धनाचे काम लवकर पूर्ण करावे, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.