Rajendra Patil Yadravkar : शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाही

आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची ग्वाही
Rajendra Patil Yadravkar
शिरोळ : महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलताना खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर. समोर उपस्थित ठरावधारक.
Published on: 
Updated on: 

शिरोळ : गोकुळ दूध संघातील सत्तेची पुनरावृत्ती करण्यासाठी शिरोळ तालुका महत्त्वपूर्ण योगदान देईल. तालुक्याला उमेदवारी देऊन महायुतीच्या नेत्यांनी अनेक वर्षांपासूनची उणीव भरून काढली आहे. त्यामुळे २७० पैकी २०० हून अधिक मते महायुतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मिळवून देत गोकुळमध्ये युतीची सत्ता कायम ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देऊ, अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

शिरोळ येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित महायुतीच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला कार्यकर्ते आणि समर्थकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, गोकुळची निवडणूक म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संसार, चुलीशी आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे. विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दूध दर वाढवून देणार, चुयेकरांच्या मुलाला चेअरमन करणार, अशा घोषणा करत आहेत. मग तुमच्याकडे सत्ता होती, तेव्हा हे का केले नाही?

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विरोधक खोट्या सहानुभूतीचा आधार घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. ही निवडणूक एकतर्फीच होऊन आपले संपूर्ण पॅनेल बहुमतांनी विजयी होणार आहे. मात्र, निवडणूक कोणतीही असली तरी निष्काळजी न राहता सर्वांनीच गांभीर्याने घेऊन प्रत्येक तालुक्यातील प्रमुखांनी जाहीर केलेल्या मतांचा आकडा मतपेटीत कसा जाईल, याची काळजी घ्यावी.

दुष्काळातही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हात बळकट : महाडिक

सध्या राज्य आणि संपूर्ण देश दुष्काळाचा सामना करत आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून दूधबिलाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात वेळेत मिळत आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे. भविष्यात दूधदर आणखी वाढवून देणे. जनावरांची वैद्यकीय उपचार सुविधा उत्तम आहे, त्यामध्ये आणखी गतिमानता आणणे, महिलांच्या योगदानाची कृतज्ञता म्हणून त्यांना विमा, मुलांना शिष्यवृत्तीची योजना आणण्याचा विचार असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार उल्हास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संजय पाटील-यड्रावकर, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील-टाकवडेकर, अमरसिंह पाटील, रामचंद्र डांगे, सतीश मलमे, धनाजी जगदाळे आदी प्रमुख उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news