

कोल्हापूर : खंडोबा तालीम मंडळाला अटीतटीची झुंज देत संपूर्णवेळ सामना 2-2 असा बरोबरीत राखला. यानंतर निकालासाठीच्या टायब्रेकरमध्ये दिलबहार तालीम मंडळाने त्यांचा 3-1 ने पराभव करून महापौर चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कोल्हापूर महानगरपालिका आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु आहे.
संपूर्णवेळ सामना 2-2 बरोबरीत
सामन्याच्या 17 व्या मिनीटाला दिलबहारकडून झालेल्या चढाईत थंगलेनच्या पासवर स्वयं साळोखेने पहिला गोल केला. 34 व्या मिनीटाला प्रथमेश भोसलेच्या पासवर थंगलेनने दुसरा गोल केला. 37 व्या मिनीटाला खंडोबाकडून विष्णू मणीकंदनच्या पासवर रोहित जाधवने एका गोलची परतफेड केली. यामुळे मध्यंतरापर्यंतच्या सामन्यात दिलबहार 2-1 ने आघाडीवर होते. उत्तरार्धात 55 व्या मिनीटाला खंडोबाकडून विनायक पाटीलच्या पासवर संकेत मेढे याने गोल नोंदवून सामना 2- 2 असा बरोबरीत केला.
टायब्रेकरमध्ये दिलबहारची बाजी
सामना बरोबरीत झाल्याने निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. दिलबहारकडून फेबीन, सुमित घाटगे, प्रथम भोसले यांनी बिनचूक गोल केले. तर लामखोलीनचा फटका गोलपोस्ट बाहेर गेला. उत्तरादाखल खंडोबाकडून संकेत मेढेने एकमेव गोलची परतफेड केली. विष्णू मणीकंडन, विनायक पाटील, प्रभू पोवार यांचे स्ट्रोक दिलबहारचा गोलरक्षक जयकुमार मेहता याने बाहेर काढून संघाला 3-1 असा विजय मिळवून दिला.
हाणामारीबद्दल दोघांना तीन सामने बंदी
बुधवारी केएसए क गट फुटबॉल स्पर्धेला न्यू पॅलेस परिसरातील पोलो मैदानावर प्रारंभ झाला. स्पर्धेत 74 संघ सहभागी झाले असून त्याची विभागणी 19 गटात करण्यात आली आहे. 108 सामन्यांतून 19 संघ बाद फेरीसाठीच्या 18 सामन्यांसाठी पात्र ठरतील. पहिल्या दिवशी आठ सामने झाले. न्यू स्टार विरुद्ध शाहूपुरी यांच्यातील सामन्यात ओम कातवरे व मोहंमद कैफ यांच्यात हाणामारी झाली. याबद्दल पंचांनी त्यांच्यावर रेडकार्डची कारवाई केली. यामुळे त्यांच्यावर तीन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, दिवसभर झालेल्या सामन्याचा निकाल असा : साई स्पोर्टस् विजयी विरुद्ध दिलबहार ब 3-1, बालाजी पार्क वि.वि. दुर्गामाता 2-0, रॅश ग्रुप वि.वि. असूसा 1-0, संयुक्त राजेंद्रनगर वि.वि. बालेकिल्ला 2-1, सिध्दार्थनगर वि.वि. यादवनगर 1-0, ब्रम्हपूरी वि.वि. वर्षापूरी 2-0, यवलूज वि.वि. आधार टायब्रेकर 5-4, न्यू स्टार वि.वि. शाहूपुरी क्रीडा 2-0.