

हमीदवाडा (जि. कोल्हापूर) : मधुकर भोसले
वारकरी परंपरेचे वैभव असलेल्या माऊलींच्या आषाढ पायी वारी सोहळ्यात अश्व व अश्व रिंगण सोहळ्यांना खूप मानाचे व श्रद्धेचे स्थान आहे. या अश्व परंपरेचा मान कर्नाटकातील शितोळे-अंकली येथील शितोळे सरकारांकडे आहे. विशेष म्हणजे आळंदी ते पंढरपूर या दिंडीत सहभागी होण्यापूर्वी अंकली ते आळंदी हा प्रवासदेखील हा अश्व पायीच करतो. त्यासाठी या माऊली अश्वाचे शनिवार, दि. २७ जून रोजी म्हणजेच द्वादशी दिवशी शितोळे-अंकली (ता. चिकोडी) येथून प्रस्थान होणार आहे. वारकरी संप्रदायात १८३२ पासूनची ही समृद्ध परंपरा आहे.
सोहळ्यात होणाऱ्या गोल व उभ्या रिंगण सोहळ्यात तसेच एकूणच सर्व सोहळ्यातदेखील या अश्वास महत्त्वाचे स्थान आहे. सोहळा मार्गस्थ झाल्यावर माऊलींच्या स्थापुढे हा अश्व चालत असतो. हा एक माऊलींचा अश्व व सोबत ज्यावर जरीपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व असे हे २ अश्व असतात. या अश्वांची मानाची परंपरा कर्नाटकातील अंकली येथील शितोळे राजे यांच्याकडे आहे.
सध्या ही परंपरा उर्जितसिंगराजे शितोळे हे चालवित आहेत. तर हे दोन्ही अश्व सोहळ्यात सामील होण्यासाठी वाहनाने नव्हे, तर पायी चालतच आळंदी येथे दाखल होतात. यंदा ८ जुलै रोजी आळंदी येथून माऊलींच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ होईल व २५ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे.
अशी आहे समृद्ध वारींची परंपरा
वारी सोहळ्यात व इतर वेळीदेखील कधीही माऊली अश्वावर कोणीही बसत नाही. त्यावर स्वतः माऊली स्वार असतात, अशी श्रद्धा आहे. जेव्हा १८३२ मध्ये हैबतबाबांनी माऊलींचा सोहळा सुरू केला, तेव्हा शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला. त्यानुसार रोज शितोळे सरकारांच्या तंबूत माऊर्लीच्या पादुकांचा मुक्काम, नैवेद्य, समाज आरतीस स्वतः किंवा प्रतिनिधींची उपस्थिती, वारीतील न्यायनिवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होणे व हे अश्व हे रीतिरिवाज कायम आहेत. सोहळ्यात रोज पहाटे ४ वाजता अश्वास निमंत्रण द्यायला चोपदार जातात.