

कोल्हापूर : राजारामपुरी, चौथ्या गल्लीमध्ये रविवारी (दि २७) पहाटेच्या सुमारास जुना महाकाय वृक्ष कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दोन मोटारींसह एका इमारतीचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबविले.
राजारामपुरी, चौथ्या गल्लीमध्ये शंभर वर्षांपूर्वीचा एक भलामोठा महाकाय वृक्ष रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कोसळला. यामुळे भलामोठा आवाज झाल्यामुळे नागरिक जागे झाले. त्यांनी याची माहिती तत्काळ अग्निशमन दलास दिली. अग्निशमन दलाचे विनोद गवळी, विजय सुतार, अभय कोळी, गिरीश गवळी, नितेश शिंगारे, अक्षय शिंगारे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कटरच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या कापून सुमारे सहा तासांनंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन मोटारींचे किरकोळ नुकसान झाले. तसेच झाड एका इमारतीवर कोसळल्यामुळे इमारतीच्या काही बांधकामासही तडे गेले.
...तर मोठी दुर्घटना घडली असती
कोसळलेला वृक्ष सुमारे १०० वर्षांपूर्वीचा असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या झाडाच्या फांद्या तोडण्यास पावसाळ्यापूर्वीच उद्यान विभागास कळविले होते. मात्र, उद्यान विभागाने याकडे दुर्लक्ष केले. रविवारी पहाटेच्या सुमारास या रस्त्यावर वर्दळ नसल्यामुळे जीवित हानी टळली. याच परिसरात एक हॉस्पिटल, आयस्क़्रीमचे दुकान असल्याने नेहमीच गर्दी असते. जर भरदिवसा हे झाड कोसळले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.
क्रेनच्या सहाय्याने मोटार बाहेर
अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, मात्र बुमचे मशिन येण्यास उशीर झाल्याने झाड हटविण्यास विलंब झाला. तसेच एक मोटार झाडाच्या बुध्यांखाली उभी होती. झाड कोसळल्यानंतर ती मोटार ५ फूट उंच मातीच्या ढिगाऱ्यावरच होती. अग्निशमनच्या जवानांनी क्रेनच्या मदतीने ही मोटार बाहेर काढली.