

कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशाच्या प्रत्येक गावात 9 ऑगस्टपासून 'माझी माती माझा देश' हे अभियान सुरू आहे. हे अभियान प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रनिष्ठा व देशप्रेम वाढवणारे आहे. या उपक्रमामधून आपल्या मातीविषयी प्रेम, जनजागृती आणि साक्षरता निर्माण होईल, असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी व्यक्त केला.
कुरुंदवाड पालिकेतर्फे कृष्णा घाट येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि शहीद जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे अनावरण, स्वातंत्र्य सैनिक, शहिदांना अभिवादन आणि स्वातंत्र्यसैनिक, वीरपत्नी, माजी सैनिकांचा तसेच सैन्य दलात सेवेत असलेल्या जवानांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमाप्रसंगी आमदार पाटील-यड्रावकर बोलत होते. मुख्याधिकारी आशिष चौहान, माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे, जवाहर पाटील, उदय डांगे आदी उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले की, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका यासारख्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे अभियान राबविले जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद झालेल्या शूरवीरांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या नावाने शिलाफलक उभारले जात आहेत. पंचप्रण शपथ दिली जात आहे, वृक्षारोपण केले जात आहे, एकूणच देशाच्या रक्षणासाठी योगदान दिलेल्या अशा सर्व घटकांना समाजाकडून सन्मान प्राप्त करून देणे, हे या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे.
यावेळी पालिका प्रशासनाला मिळालेल्या मिनी अग्निशामक गाडीचे लोकार्पण करण्यात आले. वृक्षारोपण, झेंडा-वंदन आणि शहरातील एसपी हायस्कूल, एस. के. पाटील महाविद्यालय, साने गुरुजी विद्यालय, दत्त महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढली.
यावेळी मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रमेश भुजुगडे, अजित देसाई, उमेश कर्नाळे, रणजीत डांगे, पूजा पाटील, प्रदीप बोरगे, निशिकांत ढाले, अमोल कांबळे, आनंदा शिंदे आदी उपस्थित होते.
हेही वाचा