

Kolhapur Politics |
चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ या वार्षिक चार हजार कोटी रुपयांची उलाढाल व जिल्ह्याचे पॉलिटिकल पॉवर हाऊस असलेल्या संस्थेवर महाविकास आघाडीचे सत्ता काबीज करण्याचे स्वप्न महायुतीने उलटविले आहे. गोकुळमध्ये बहुतेक सर्व पक्ष सत्तेत असले तरी आता तेथे पक्षीय राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे आजवर सहकारात पक्ष नसतो या समजाला धक्का बसला आहे.
गोकुळच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या आनंदराव पाटील चुयेकर यांच्या मुलाला डावलून व ऐनवेळी अध्यक्षपदाचा उमेदवार बदलण्यास भाग पाडून महायुतीने बाजी मारली आहे. एकेकाळी महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात असलेल्या या संघावर जिल्ह्यातील नेत्यांनी एकजूट करून ताबा मिळविला. मात्र पाच वर्षे सत्ता कायम ठेवण्यात नेत्यांना यश आले नाही.
यामागे नेत्यांच्या भूमिकेपेक्षा राज्यातील सत्तांतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या भूमिका गोकुळच्या सत्तांतरासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. यापुढील राजकारण राज्यातील नेत्यांच्या नजरेवरील इशार्यावर चालणार हेही स्पष्ट झाले आहे.
गेली अनेक वर्षे महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील आणि अरुण नरके यांनी गोकुळवर मजबूत पकड ठेवली होती. गोकुळ वगळता जिल्ह्यातील अन्य सर्व सत्ताकेंद्रांत बाजी उलटविण्यात विरोधकांना यश आले होते. मात्र त्यांचा विजयरथ गोकुळमध्ये अडला होता. महाडिक विरोधकांची एकजूट करीत नेत्यांनी गोकुळमध्ये सत्तांतर घडविले. चार वर्षे त्यांची सत्ता चालली. मात्र शेवटच्या वर्षी अध्यक्षपद कोणाकडे यावरून बेबनाव निर्माण झाला.
अरुण डोंगळे यांनी अचानकपणे अशी भूमिका का घेतली यामागे निश्चित काहीतरी कारणे असली पाहिजेत. गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्याशिवाय आपण राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेतली. दुसर्या दिवशी त्यांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर ज्या आघाडीमार्फत ते अध्यक्षपदी विराजमान झाले त्या नेत्यांना थेट आव्हान देत आता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितल्याशिवाय आपण राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेतली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, अजित पवार राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांच्यासह अन्य पक्ष आणि नेत्यांकडे गोकुळची सूत्रे होती. त्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी डोंगळे हे फडणवीस आणि शिंदे यांना भेटतात मग अजित पवार यांना का भेटत नाहीत, असा सवाल करून त्यांना पेचात टाकण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्हा संघात जिल्ह्यातील नेत्यांना निर्णय घेऊ द्यावा, अशी विनंती केली. त्यानंतर शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव जाहीर झाले.
भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळसारख्या बलाढ्य आर्थिक गडाची सूत्रे ही महाविकास आघाडीच्या हाती असणे कामा नये अशी भूमिका घेताच राज्यातील नेतृत्वाने हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, विनय कोरे यांच्यावर दबाव आणला.
त्यामुळे चुयेकर यांचे नाव मागे पडले आणि तडजोडीचा तसेच निवडणुकीत सत्तेवर आलेल्या राजर्षी शाहू आघाडी यांना मान्य होणारा उमेदवार म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांचे नाव निश्चित झाले व त्यांची अपेक्षेप्रमाणे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. महायुतीचा उमेदवार असला तरी उमेदवाराच्या नावाचे बंद पाकीट जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी गोकुळच्या संचालकांकडे सोपविले हे आणखी एक वैशिष्ट्य.
पुढील वर्षी गोकुळ संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. या निवडणुका आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढल्या जाणार हे स्पष्ट आहे. या निवडणुकीत राज्यातील नेत्यांचा मोठा वाटा असेल. मात्र या निमित्ताने राज्यातील नेत्यांचा गोकुळमध्ये सहभाग झाला आहे. थेट राजकीय पक्षाचे नाव घेऊन सत्ता स्थापन झाली आहे. आता महाविकास आघाडीनेच गोकुळमध्ये राजकारणाची सुरुवात केली, असा आरोप धनंजय महाडिक यांनी केला आहे तर राजर्षी शाहू आघाडी गोकुळमध्ये शाबूत आहे, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
पुढील वर्षी गोकुळच्या संचालक मंडळाची निवडणूक होईल. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गोकुळच्या गेल्या चार वर्षांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी धनंजय महाडिक यांनी केली. आता हसन मुश्रीफ यांची कसोटी आहे.
तत्कालीन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील या महत्त्वाच्या आर्थिक सत्ता केंद्रावर महायुतीचीच सत्ता असली पाहिजे हे नेत्यांना पटवून दिले आणि तेथून सुरू झाला सत्तापालटाचा खेळ. या खेळात कुणी कोणाचा मोहरा म्हणून वापर केला हे स्पष्ट होईल. मात्र सत्तांतर झाले आणि महायुतीला सत्ता मिळाली हे वास्तव आहे.