

कोल्हापूर : कोणी काही म्हटले तरी ‘गोकुळ’चा अध्यक्ष महायुतीचाच झाल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना ठामपणे सांगितले. महाविकास आघाडीनेच ‘गोकुळ’च्या गेल्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन ‘गोकुळ’मध्ये दबावाचे राजकारण आणल्याचा आरोप त्यांनी केला. ठेवींची स्थिती, वासाचे दूध आणि वाढीव संस्थांचे दूध संकलन किती? याची श्वेतपत्रिका सतेज पाटील यांनी स्वत: प्रसिद्ध करावी. आता त्यांनी चमच्यांमार्फत बोलू नये, असा सल्लाही महाडिक यांनी दिला.
‘गोकुळ’ अध्यक्षपद उमेदवार बदलात आपण कोठेही नव्हतो. ‘गोकुळ’चा अध्यक्ष महायुतीचा व्हावा, असे आपण यापूर्वी बोललो, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले. त्याचा संदर्भ ‘गोकुळ’च्या गेल्यावेळच्या निवडणुकीचा होता. सहकारात राजकारण आणू नये. त्या त्या संस्थाचालकांनी संस्था चालवाव्यात, हे बरोबर आहे. 2021 च्या ‘गोकुळ’ निवडणुकीवेळी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यांनी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचे पॅनेल करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शाहू आघाडी नाव दिल्याचे महाडिक म्हणाले.
महादेवराव महाडिक, पी. एन. पाटीलविरुद्ध सर्व अशी ही निवडणूक झाली. आमच्याकडे येणार्यांवर तत्कालीन मुख्यमंत्र्यांमार्फत दबाव टाकण्यात आला. राज्यात महायुतीची सत्ता आहे. मी भाजपचा पदाधिकारी आहे. त्यामुळे ‘गोकुळ’चा अध्यक्ष महायुतीचा व्हावा, ही आपली भावना होती. तसेच ‘गोकुळ’मध्ये घडल्याचे सांगून महाडिक म्हणाले की, कोणी काही म्हणो, ‘गोकुळ’चा अध्यक्ष महायुतीचा झाला आहे.
महाडिकांचे नाव घेत स्वत:ला थोर समजणारे सतेज पाटील यांना पाण्यात कायम आम्हीच दिसतो. ‘गोकुळ’चा विषय असला तरी महाडिक म्हटले की टँकर, पेट्रोल पंप, कारखाना अशा टीकेपलीकडे जाण्यास ते तयार नसल्याचे महाडिक म्हणाले.
‘गोकुळ’सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढू. हसन मुश्रीफ आमच्याच सोबत असतील. पाटील यांची खुनशी प्रवृत्ती आणि मग्रुरी विधानसभा निवडणुकीत शाहू महाराज यांच्याशी बोलताना सर्वांनी पाहिली आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल, असेही ते म्हणाले.