

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागलमध्ये विधानसभा निवडणुकीची खडाखडी आतापासूनच सुरू झाली आहे. विद्यमान आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी समरजित घाटगे यांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत विधानसभेसाठी शड्डू ठोकले आहेत. त्यात माजी आमदार संजय घाटगे आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या भूमिकांवरून रंगत आणली आहे. निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होईल, त्याला अद्याप दोन महिन्यांचा अवधी असतानाच कागल मतदारसंघातून उमेदवार कोण असेल? यावरून रणकंदन सुरू झाले आहे, त्यामुळे कागलच्याच नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकारणाला उकळी आली आहे.
माझ्यासमोर कोण उभे राहणार, याची मी चिंता करत नाही. लढत तिरंगी होऊ दे, नाही तर चौरंगी... मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात असणार, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचे काम अनिल देशमुख करत आहेत, असा आरोप करत मराठा योद्धा मनोज जरांगे यांचे वक्तव्य खेदजनक असल्याचेही त्यांनी सांगितले. कागल विधानसभा मतदारसंघातून समरजित घाटगे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी देण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांना विचारता ते म्हणाले, कोण जिंकणार हे जनता ठरवेल. संजय घाटगे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत आणि उघडपणे पाठिंबा देण्याचे धाडस त्यांनी दाखवले. त्यांच्या पाठिंब्यामुळे मला विधानसभा निवडणुकीत बळकटी मिळेल आणि हत्तीचे बळ प्राप्त होईल. विशाळगडावरील वातावरण शांत झाले आहे. ते आता पुन्हा तिथे जाऊन कोणी बिघडवू नये, असे आवाहनही त्यांनी खा. अली, आझमी यांच्या भेटीबाबत बोलताना केले. अनिल देशमुख यांना हे सर्व काढायचे होते, तर यापूर्वीच काढायला हवे होते. इतके दिवस थांबण्याची गरज नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस यांना बदनाम करण्याचे काम देशमुख करत आहेत, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला.
तिसरी, चौथी आघाडी होईल
जरांगे यांच्याविषयी बोलताना मुश्रीफ म्हणाले, निवडणुकांच्या तोंडावर समाजात तेढ वाढवणे योग्य नाही. प्रत्येकाने बोलताना आपल्या भाषेवर आणि तोंडावर संयम ठेवला पाहिजे. यावेळी बहुरंगी लढती होतील, आता कोणी थांबायला तयार नाही. तिसरी, चौथी आघाडी तयार होईल. आ. बच्चू कडू हे तिसरी आघाडी करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मला अनेक आश्वासने दिली जात आहेत; पण आम्हाला जनसामान्यांचा विकास पाहिजे आहे म्हणून मुश्रीफ यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असून, यामध्ये कोणतीच शंका घेण्याचे कारण नाही. त्याचे काय परिणाम होतील ते होऊ देत. विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कुठल्याही परिस्थितीत मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून, त्यांच्या सोबत राहू, असे प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले.
साके येथील विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, ‘गोकुळ’चे संचालक अंबरिश घाटगे उपस्थित होते. घाटगे म्हणाले, माझा भाजपला विरोध आहे. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे समतावादी नेते आहेेत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. या निर्णयाबद्दल कोणी कितीही, काहीही बोलले तरी आमची विचारधारा आणि दिशा बदलणार नाही. गतवेळी मी मुश्रीफांकडून पैसे घेऊन निवडणूक लढवल्याचे काही लोकांनी आरोप केले. तुम्ही आल्लाहची शपथ घेऊन सांगा की, रुपयाही तुम्ही मला दिला आहे काय? असेही घाटगे हे मुश्रीफ यांना उद्देशून म्हणाले. मागील निवडणुकीत भिडे हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आले होते. तुम्ही माघार घ्या, तुम्हाला विधान परिषदेचे आमदार करतो; पण उद्धव ठाकरे यांनी मला विश्वासाने उमेदवारी दिली होती. त्यांचा विश्वासघात करून विधान परिषदेचे आमदार काय कोणतेच पद नको. हसन मुश्रीफ म्हणाले, संजय घाटगे यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मी संजय घाटगे यांना कोणत्याही निवडणुकीत 1 रुपयासुद्धा कधी दिला नाही. हे शपथपूर्वक सांगतो.
कागलच्या विकासासाठी निवडणुकीला उभा राहणारच आहे आणि शंभर टक्के ही निवडणूक जिंकणारच आहे, अशा शब्दांत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून येणार्या बातम्यांबाबत आज काहीही बोलणार नाही, असेही ते म्हणाले.
स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या 76 व्या जयंतीनिमित्त सानिका स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित शालेय शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे संजय मंडलिक, तर अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील होते. घाटगे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत असणारा विकास करून कागलला वेगळ्या उंचीवर नेण्याचा मानस आहे.
महायुतीचा उमेदवार म्हणून मी लोकसभेची निवडणूक लढलो. माझा पराभव झाला; पण पुढील काळातसुद्धा मी महायुतीचेच काम करणार आहे. सध्या माझ्यावर कोल्हापूर दक्षिण व उत्तर मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. कागलची जबाबदारी माझ्याकडे नाही. महायुतीचे नेते माझ्यावर कागलची जबाबदारी देतील त्यावेळी निश्चितपणे आम्ही आमची भूमिका वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन स्पष्ट करणार आहोत. कागलच्या विकासाच्या राजकारणाला आमचा नेहमीच पाठिंबा आहे, असे प्रतिपादन माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले.
मंडलिक म्हणाले, सर्व समाजाला बरोबर घेऊन जायची शिकवण छत्रपती शाहू महाराजांनी दिली. तीच शिकवण पुढे घेऊन जाण्याचे काम स्व. विक्रमसिंह घाटगे व स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी केले. काही मंडळींना वाटते मुस्लिम व दलित समाजाची मते घेतली म्हणजे आपण पुरोगामी विचारांचे झालो. असा दावा करणार्या मंडळींना मला आवाहन करायचे आहे की, त्यांनी दलित समाजाचा उमेदवार निवडणुकीसाठी उभा करावा व निवडून आणावा.