Gokul News : ‘गोकुळ’ कोणा एकाची मालमत्ता नाही; एका फरकाने विजय म्हणजे जिल्ह्यावर वर्चस्व नव्हे

आ. सतेज पाटील यांच्यावर महायुतीचा पत्रकाद्वारे पलटवार
Kolhapur Gokul Dudh Sangh
Kolhapur Gokul Dudh Sangh Pudhari
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीला एका जागेच्या फरकाने मिळालेला विजय म्हणजे संपूर्ण जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व नव्हे. गोकुळ ही कोणत्याही एका पक्षाची, नेत्याची मालमत्ता नाही. ती लाखो दूध उत्पादकांच्या कष्टातून उभी राहिलेली संस्था आहे. या दूध उत्पादकांच्या हिताची आणि लोकशाहीची चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांची ही भूमिका लोकशाहीसाठी कमी आणि स्वत:च्या राजकीय सुलभतेसाठी अधिक असल्याचा पलटवार महायुतीमधील घटक पक्षांच्‍या जिल्‍ह्याध्‍यक्षांनी पत्रकाद्वारे केला आहे.

२५ पैकी १३ संचालक त्यांचे निवडून आले, त्याच पद्धतीने आमचेही १२ संचालक याच जनतेने निवडून दिले. त्यामुळे साडेपाच लाख दूध उत्पादकांचा कौल केवळ आपल्यालाच मिळाला, अशा आविर्भावात आमदार सतेज पाटील यांनी राहू नये, असा टोलाही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भाजपचे राजवर्धन निंबाळकर, शिवसेनेचे विजय बलुगडे आणि जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी संयुक्तपणे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे लगावला.

गोकुळच्या पोटनियमांनुसार अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी १४ संचालकांची गणपूर्ती आवश्यक आहे. हा नियम निवडणुकीनंतर तयार झालेला नाही. आमचे १२ संचालकही मतदारांनी निवडून दिले आहेत. त्यामुळे विरोधी आघाडीची गणपूर्ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी उपस्थित राहावे, अशी अपेक्षा करणे म्हणजे त्यांच्या मतदारांच्या विश्‍वासाशी प्रतारणा करण्यास सांगण्यासारखे आहे. दरम्यान, आ. पाटील यांच्‍या समर्थकांकडून समाजमाध्यमांवर चिथावणीखोर भाषा वापरली जात असल्याचा आरोप करत राजकीय मतभेद धमक्यांऐवजी लोकशाहीच्या चौकटीत मांडावेत, असे आवाहन महायुतीने केले. अध्यक्ष निवड आणि गणपूर्तीचा प्रश्न कायदा व पोटनियमांनुसारच सुटला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

जनाधार बदलला असा निष्‍कर्ष काढू नका

गोकुळ निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत मतभेदांचा फायदा आ. पाटील यांना झाला आहे. पण त्‍यातून जिल्‍ह्याचा संपूर्ण राजकीय जनाधार बदलला, असा निष्‍कर्ष त्‍यांनी काढू नये. काठावरच्‍या विजयाच्‍या आधारे संपूर्ण जिल्‍ह्याचे राजकीय प्रतिनिधित्‍व आपल्‍याकडेच असल्‍याचा दावा करणे म्‍हणजे उर्वरित मतदारांच्‍या कौलाकडे दुर्लक्ष करण्‍यासारखे आहे, असे पत्रकात म्‍हटले आहे.

सतेज पाटील दोन संचालक आम्‍हाला देणार का?

समविचारी आघाडीला अध्यक्ष निवडायचा असल्यास त्यांनी तो जरूर निवडावा. मात्र त्‍यांच्‍याकडून भावनिकतेची ढाल केली जात आहे. आम्हालाही अध्यक्ष निवडताना गणपूर्ती करण्‍यासाठी दोन संचालकांची गरज आहे. अध्‍यक्ष निवड आणि गोकुळचा कार्यभार सुरळीत चालविण्‍यासाठी आ. पाटील त्यांचे दोन संचालक आम्‍हाला देऊन सहकार्य करतील का, असा सवालही त्यांनी केला आहे.

मतदारांशी प्रामाणिक राहणे आमची भूमिका

आ. पाटील यांनी गोकुळ अध्‍यक्षपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांच्‍या नावाची घोषणा निवडणुकीपूर्वीच केली आहे. तरीही जनतेने महायुतीला १२ जागांवर कौल दिला. त्‍यामुळे चुयेकर यांच्‍या उमेदवारीला कोणाचा वैयक्‍तिक विरोध हा आमचा मुद्दा नसून आमच्‍या मतदारांनी दिलेल्‍या कौलाशी प्रामाणिक राहणे ही आमची भूमिका असल्‍याचे महायुतीने स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.