कोल्हापूर : राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पाच लाख रुपये खर्चापर्यंतचे उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भातला शासन आदेशही प्रसिद्ध झाला आहे. परंतु कोणत्याही रुग्णालयातून अद्याप ही योजना सुरू केलेली नाही. पूर्वीप्रमाणेच महात्मा फुले योजनेतून दीड लाखापर्यंतचेच उपचार केले जात आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा फटका बसत आहे. अंमलबजावणी कोणत्या कारणासाठी थांबली आहे, याबाबत मात्र उलटसुलट उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो रुग्णांच्या मोफत उपचारात खोडा घातला जात आहे.
राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र शासनाची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकत्रित करून सर्वच प्रकारच्या रेशन कार्डधारकांना पाच लाखापर्यंतचे उपचार या योजनेतून केले जाणार आहेत. गरिबांवरील मोठा भार या योजनेमुळे कमी होणार आहे. मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले योजनेतून पूर्वी 2 लाख 50 हजार रुपये खर्चापर्यंतचे उपचार केले जात होते. नव्या आदेशात ही मर्यादा 4 लाख 50 हजार केली आहे. सध्याच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून 996 तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून 1209 आजारावर मोफत उपचार केले जात होते. आता नव्या आदेशाप्रमाणे यापैकी मागणी नसलेल्या 181 आजारांवरील उपचार बंद करून गरज असणार्या नव्या 328 आजारांचा समावेश केला आहे. त्यामुळे 1356 आजारांवर आता उपचार होणार आहेत. यापूर्वी पांढरे रेशन कार्ड असणार्या रुग्णांचा समावेश योजनेत होत नव्हता. आता पाढंर्या रेशन कार्डधारकांनाही उपचार मिळणार आहेत.
घोडे अडलेय कुठे?
कोणतीही योजना शासनाने सुरू केली की, त्याचा शासन आदेश होताच ती योजना सुरू होते. या योजनेचा शासन आदेश जुलैमध्ये झाला आहे. घोषणा तत्पूर्वीच झाली आहे. तरीदेखील अंमलबजावणीच्या पातळीवर गोंधळ आहे.
* सरासरी दरवर्षी 55 लाख रुग्णांवर उपचार
* दीड हजार कोटींची तरतूद
* 2012 पासून 60 हजार हृदय शस्त्रक्रिया
* कॅन्सरच्या एक लाख शस्त्रक्रिया
* 45 हजार डायलेसिस
* इतर शस्त्रक्रिया व उपचार केलेल्या रुग्णांची संख्या एक लाख 51 हजार