कोल्हापुरातील 'या' मंदिरात एकाच गाभाऱ्यात पुजले जाते 'कोपेश्‍वर' अन् 'धोपेश्‍वर'

Mahashivratri 2025 : साऊथलाच नव्हे तर कोल्हापुरातही आहे स्थापत्यशैलीचे अद्भूत मंदिर
Mahashivratri 2025
कोल्हापुरातील खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्‍वर मंदिरInstagram
Published on
Updated on
स्वालिया शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - कोल्हापुरच्या शिरोळ तालुक्यात असे एक मंदिर आहे, जे पाहिल्यानंतर तुम्हाला साऊथच्या मंदिराची आठवण नक्कीच येईल. अद्भूत स्थापत्यशैलीचा नमूना असलेल्या या मंदिरात एकाच गाभाऱ्यात शिवशंकर आणि श्रीविष्णू यांची पूजा केली जाते. या मंदिराचे केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर वैज्ञानिक दृष्टीकोनही महत्त्वाचे आहे. याचे उत्तम उदाहरण त्रिपुरारी पौर्णिमेला पाहता येते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वर्गमंडपाच्या बरोबर मधोमध चंद्र येतो. हा नजारा वर्षातून एकदाच पाहायला मिळतो. हे मंदिर आहे 'कोपेश्वर'. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावामध्ये साध्या दगडी कमानीतून आत गेल्या भव्य असं हे मंदिर आहे.

कोपेश्‍वर मंदिराला केंद्रीय पुरातत्‍व विभागाने २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्‍ट्रातील राष्‍ट्रीय संरक्षित स्‍मारक म्‍हणून घोषित केले. कोपेश्‍वर मंदिर अप्रतिम स्‍थापत्‍यशैलीसाठी प्रसिद्ध आहे. बेसॉल्‍ट आणि ग्‍लास पॉलिशिंग केल्‍याप्रमाणे या मंदिराचे बांधकाम आहे. पावसाळ्‍यात ऊबदारपणा आणि उन्‍हाळ्‍यात गारवा टिकून राहावा, त्‍यादृष्‍टीने तत्‍कालीन स्‍थापत्‍य विशारदांनी केलेला प्रयत्‍न येथे दिसून येतो. या मंदिराचे वैशिष्‍ट्‍ये म्‍हणजे सुंदर गजपट्‍ट (मंदिर सभोवताली हत्तींच्या मूर्तीची शिल्पे) असणारे हे भारतातील एकमेव मंदिर आहे. उत्‍कृष्‍ट शिल्‍पकलेचा अविष्‍कार पाहता अनेकजण या मंदिराची तुलना खजुराहोच्‍या मंदिराशी केली जाते. या स्‍थानाचे मूळ नाव कोप्‍पम किंवा कोप्‍पद होते. पण, मोगल सरदार खिद्रखान मोकाशीने कोप्‍पम जिंकल्‍यानंतर त्‍याच्‍या नावावरून खिद्रापूर असे नाव त्‍याला मिळाले. येवूर (जि. विजापूर) येथील शिलालेखात कोपेश्‍वराचा उल्‍लेख मिळतो. तसेच एका ताम्रपटातही या मंदिराचा उल्‍लेख सापडतो.

कोपेश्वर मंदिरात आहेत दोन शिवलिंग

या मंदिराच्या गाभार्‍यात कोपेश्‍वर (महेश) आणि धोपेश्‍वर (विष्‍णू) अशी दोन शिवलिंगे आहेत. याला लागूनच सभामंडप आहे. सभामंडपावर सहा दगडी गवाक्ष असून हे वैशिष्‍ट्‍य असणारे हे असे एकमेव मंदिर आहे. दुसरे वैशिष्‍ट्य म्हणजे या मंदिरात नंदी नाही. मंदिराचे वेगळेपण म्‍हणजे स्‍वर्गमंडपाची रचना. या मंडपाबाहेर २४ हत्तींची मूळ रचना होती. पैकी ११ हत्ती येथे पाहावयास मिळतात. ४ प्रवेशद्‍वार आणि ४८ खांबांवर हे मंदिर उभारलेले असून मंदिराच्‍या दर्शनी भागात आकाशाच्‍या दिशेने १३ फूट व्‍यासाचे गवाक्ष आहे. त्‍याच मापाची खाली रंगशिला (चंद्रशीला) (गोलाकार दगडासारखी) असून त्‍याभोवती १२ खांब वर्तुळाकृती आढळतात. मंदिरावर नर्तिका, वादक, लेखिका, शस्‍त्रधारी द्‍वारपाल, सप्‍तमातृकांच्‍या प्रतिमा आहेत. यावरून, तत्‍कालीन समाजातील स्‍त्रियांना असणारे उच्‍च स्‍थान समजते.

खिद्रापूर मंदिर परिसरात १२ शिलालेख

मंदिर परिसरात १२ शिलालेख असून त्‍यातील ८ शिलालेख कन्‍नड भाषेतील आहेत. त्‍यापैकी एक संस्‍कृतमध्‍ये, दुसरा देवनागरीत आहे. पहिला शिलालेख नगारखान्‍याच्‍या दक्षिण बाजूच्‍या विरगळावर जुन्‍या कन्‍नड भाषेत लिहिलेला आहे. आणखी एका शिलालेखात कोपश्‍वराची स्‍थिती, कुसुमेश्‍वर, कुटकेश्‍वर या नावांचा उल्‍लेख येतो.

खिद्रापूर मंदिरावर दक्षिण स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव

मंदिरात प्रवेश करताना नगारखाना, स्‍वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ, गाभारा असे बांधकाम दिसते. मंदिराच्‍या पायथ्‍याशी खुरशिला, गजपट्‍ट त्‍यावर नरपट्‍ट आणि त्‍यावरील देवकोष्‍ट (चौकट असल्‍यासारखे) आणि नक्षीकाम अशी रचना दिसते. मंदिरावरील भवानी, काळभैरव, विष्‍णू, ब्रम्‍हदेव, चामुंडी, गणपतीची मूर्ती ही हिंदू देवदेवता, पंचतंत्रातील कथा तर उत्तरेच्‍या बाजूस घंटा वादिका, अहिनकुल (साप-मुंगुस), मिथून शिल्‍प आदी शिल्‍पे जैन मंदिराची वैशिष्‍ट्‍ये दशर्वणारी आहेत. मंदिराचे शिखर गोपुरासारखे असल्‍याने दक्षिणेतील स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव दिसतो.

मंदिरातील आखाती शिल्‍प

मंदिरावर इराणी किंवा आखाती व्‍यक्‍तीचे शिल्‍प आहे. इराणचा बादशहा दुसरा खुस्रो याने राजदुतामार्फत चालुक्‍य दरबारी नजराणा पाठवला होता. यावरून, चालुक्‍यांचे इराणशी संबंध होते, असे दिसते. या भेटीचे प्रतिक म्हणून त्‍या इराणी राजदुताचे शिल्‍प कोरले असावे, असे जाणकार सांगतात.

सप्‍टेंबर, १७०२ मध्‍ये मोगल बादशाह औरंगजेबने केलेल्‍या आक्रमणात येथील मूर्तींची मोडतोड केली होती. तरीही या मंदिराचे बांधकाम इतके उत्तम आहे की, २००५ साली आलेल्‍या महापुरातदेखील मंदिर सुस्‍थितीत राहिले.

खिद्रापूर धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून नावारुपास

आज खिद्रापूर धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून नावारुपास येत आहे. पुजेसाठी हार-फुले, अगरबत्ती, पेढे विक्री करण्यासाठी किरकोळ व्यावसाईक मंदिराबाहेर असतात. परिसरात आता जेव‍ण-खाण्याची सोय होत आहे. मंदिराबाहेर, मसाले ताक, कोकम, सरबत, चिकू, पेरु, केळी, बोर यासारखे फळविक्रेते असतात. शिवाय, चिरमुरे, शेंगदाणे, वाटाणेसारखा हलके-फुलके स्नॅक देखील मिळते.

त्रिपुरारी पौर्णिमेला रंगतो उत्सव

त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिलेला व्यापणारा चंद्रप्रकाशाचा उजेड रात्री भाविकांना याची देही, याची डोळा पाहता येतो. याचदिवशी खिद्रापुरातील कोपेश्वराची यथायोग्य विधीवत पूजा केली जाते. येथील महाआरती खास असते. संध्याकाळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव, त्रिपुरा प्रज्वलन केले जाते. भजन, कीर्तन, नृत्याविष्कार असा उत्सव फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा केला जातो.

खिद्रापूरला जाण्‍याचा मार्ग

खिद्रापूरला जाताना ग्रामीण भागातून जावे लागते. पुढे रस्त्यांच्या दोन्ही बाजूला हिरवेगार शेत-शिवार आहे.

  1. एसटीने पुढील तीन मार्गाने खिद्रापूर (ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर) येथे जाता येते.

  2. हातकणंगले-शिरोळ-नृसिंहवाडी-कुरुंदवाड-अकिवाट-खिद्रापूर

  3. कोल्‍हापूर-इचलकरंजी-कुरूंदवाड-अकिवाट-खिद्रापूर

  4. कोल्‍हापूर-हुपरी-रेंदाळ-बोरगाव-दत्तवाड-सैनिक टाकळी-खिद्रापूर

आणखी काय पाहाल?

नृसिंहवाडी - नरसोबाची वाडी येथील दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रभरातून लोक इथे दर्शनाला येतात. पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम याठिकाणी होतो. कृष्णा नदी पुढे वाहत कर्नाटकात जाते. येथील वाडीची बासुंदी प्रसिद्ध आहे.

सर सेनापती संताजी घोरपडे समाधी - नरसोबाची वाडी मंदिरापासून काही अंतरावर सर सेनापती संताजी घोरपडे समाधीस्थळ आहे. याठिकाणी एक वाड्याची मोठी वास्तू असून समोर कृष्णा नदी वाहताना दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news