

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे संस्थापक व आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा मंगळवारी कोल्हापुरात महासत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला दीड लाखाहून अधिक भाविक उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी दुपारी 4 वाजता श्री श्री रविशंकर यांचे कोल्हापुरात आगमन होणार आहे. यानंतर शिवाजी विद्यापीठ येथे सरपंच परिषदेला ते मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता तपोवन मैदान येथे महासत्संग होणार आहे. श्री श्री रविशंकर यांच्या स्वागतासाठी कोल्हापूरनगरी सज्ज झाली आहे.
शिवाजी विद्यापीठ येथील राजमाता जिजामाता सभागृह येथे सरपंच परिषद होणार आहे. या परिषदेला पालकमंत्री दीपक केसरकर हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नवनिर्वाचित 1,025 सरपंचांना 'गुरू ग्राम संदेश' या कार्यक्रमाद्वारे श्री श्री रविशंकर हे मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ची तीस वर्षांपासून राबवली जाणारी आदर्श ग्राम योजना आणि विविध ग्रामीण प्रकल्पांबाबत माहिती देण्यात येणार आहे. तब्बल तेरा वर्षांनी श्री श्री रविशंकर यांचा कोल्हापुरात सत्संग होणार आहे. तपोवन मैदान येथे होणार्या या महासत्संग कार्यक्रमासाठी कोपेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. गान, ज्ञान आणि ध्यान या संकल्पनेनुसार सत्संगामध्ये सुश्राव्य भजन होणार आहे. यावेळी ज्ञानचर्चा व ध्यान होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, बेळगाव येथील भाविक यामध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी 300 फुटांचा भव्य रॅम्प उभारण्यात आला आहे. तपोवन मैदान परिसरात विविध 18 ठिकाणी दुचाकी व चारचाकी, अशा सुमारे 60 हजार वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता दक्षिण काशी करवीर क्षेत्रामध्ये महालक्ष्मी होम होणार आहे. यासाठी बंगळूर आश्रमातील वेद विज्ञान महाविद्यापीठातील प्रशिक्षित वैदिक पंडित येणार आहेत. दरम्यान, कोल्हापुरातील दीडशे प्रशिक्षक आणि हजारो स्वयंसेवक कार्यरत आहेत.