Valentines Day 2026 | ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट’ ते ‘लव्ह अ‍ॅट सेन्स’पर्यंत

प्रेमाची परिभाषा बदलतेय... कौटुंबिक, सामाजिक नातेबंधांचा परिणाम
Valentines Day 2026
Valentines Day 2026 | ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट’ ते ‘लव्ह अ‍ॅट सेन्स’पर्यंत
Published on
Updated on

अनुराधा कदम

कोल्हापूर : एक काळ होता, नजरेला नजर भिडायची आणि प्रेम व्हायचं. वयाच्या सोळाव्या वर्षाच्या उंबरठ्यावर मनात उमलणारं प्रेम हे बेधुंद आणि आभासी स्वप्नांनी रंगलेलं असायचं. म्हणूनच ‘सोळावं वरीस धोक्याचं’ ही म्हण प्रचलित झाली. कॉलेजच्या कट्ट्यावरचा एक कटाक्ष आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी पुरे व्हायचा. त्या वयात प्रेम म्हणजे ना भविष्याचा विचार, ना जबाबदार्‍यांची जाणीव. मात्र आज प्रेमाची परिभाषा बदलताना दिसते आहे. प्रेमात पडणं थांबलेलं नाही; पण प्रेमाला होकार देण्याची, प्रेमात व्यक्त होण्याची पद्धत बदलली आहे. ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट’पासून ‘लव्ह अ‍ॅट सेन्स’पर्यंतचा हा प्रवास प्रेमभावनेतील विविध कंगोरे दाखवणारा आहे. बदलत्या काळात स्वत:ला आणि भविष्याला जरा जपून पावलं टाकली जात आहेत.

भिरभिरणारी नजर,

थरथरणारे ओठ,

नजरानजर झाल्यावर

माती उकरणारे बोट,

आणि तिच्या गालावरती,

गुलाबाची साय असते,

याहून वेगळं सांग दोस्ता,

प्रेम दुसरं काय असते?...

14 फेब्रुवारी हा दिवस जागतिक व्हॅलेंटाईन डे. आजच्या दिवशी आवडत्या व्यक्तीविषयीचं प्रेम ओठावर आणण्याचा आणि होकार देण्याचा खास दिवस. प्रेमाच्या या प्रवासात भावना तीच आहे, हृदयाची धडधड तीच आहे. पण प्रेमाकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन सतर्क आणि व्यावहारिक झाला आहे. आजची तरुणाई प्रेमात पडते, पण डोळसपणे. ती स्वतःला विचारते, हे नातं केवळ आकर्षणावर उभं आहे का... आयुष्याच्या वादळात टिकेल इतकं भक्कम आहे का... या विचारामागे अनेक अनुभवांची शिदोरी आहे. घरातील किंवा नात्यातील जुने अनुभव, ताणतणाव, आर्थिक संघर्ष, संवादाअभावी मोडलेले संसार हे सगळं पाहताना फक्त प्रेम पुरेसं नसतं ही जाणीव मनात घर करते. समाजात वाढती तुटलेली नाती, मानसिक असुरक्षिततेच्या घटना यामुळेही निर्णय आजच्या मुलींकडून घेतला जात आहे.

सोशल मीडियाच्या आभासी जगानेही या मानसिकतेला आकार दिला आहे. प्रेमातील गोड संवाद आणि प्रत्यक्ष आयुष्यातील वास्तव यातला फरक महत्त्वाचा असून केवळ शब्दांवर किंवा शारीरीक आकर्षणावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वभाव, मूल्यं आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतोय. शिक्षण आणि स्वावलंबनामुळे आजची मुलगी स्वतःची ओळख ठामपणे जाणते. आजची तरुणी प्रेमात पडताना हृदयाचा ठोका ऐकतेच. पण त्याच वेळी भविष्याचा आवाजही ऐकते. तिची करिअरची स्वप्नं आहेत, आत्मसन्मान आहे, स्वातंत्र्याची जाणीव आहे, त्यामुळे जोडीदार निवडताना ती फक्त भावनिक आधार नव्हे, तर समानतेची आणि सन्मानाची अपेक्षा चोखंदळपणे करते.

काय आहेत कारणं?

* कौटुंबिक व सामाजिक नात्यांतील गुंतागुंत

* सोशल मीडियावरील आभासी प्रेमाचे हिडीस प्रदर्शन

* आर्थिक स्थैर्याची जाणीव

* नात्यात सन्मान व सुरक्षेची अपेक्षा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news