Leopard Attack Shahuwadi
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असून, पशुधनावर हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. सौते परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सौते येथील माजी सरपंच भीमराव दादू पाटील यांच्या घरासमोर असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
दरम्यान, बाळू गणपती केसरे यांच्या पाळीव बकरीवरही बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
शाहूवाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाणे तसेच रस्त्याने ये-जा करणेही धोकादायक बनले आहे. वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, परिसरात पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे, तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या पशुधनाची योग्य ती भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी सौते परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.