

कुरुंदवाड : तेरवाड (ता. शिरोळ) येथील गंगापूर उपनगरात दुपारी शॉर्टसर्किटमुळे एका घराला भीषण आग लागून संसारोपयोगी साहित्य, मुलीच्या प्रसूतीसाठी ठेवलेली ९० हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच सोन्या-चांदीचे दागिने आगीत जळून खाक झाले. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास घरातील बेडरूममधील विद्युत वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. काही क्षणांतच धुराचे लोट संपूर्ण घरभर पसरल्याने कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली. आयुब बेपारी यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. सामाजिक कार्यकर्ते इरफान बेपारी,स्वप्नील शिंदे,फारूक बेपारी, आदर्श उगळे, पंकज म्हावळे,विकास आवळे,सूरज उगळे यांच्यासह ग्रामस्थांनी घागरीने पाणी टाकून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने ती नियंत्रणात येत नव्हती. त्यानंतर तातडीने कुरुंदवाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाचे कर्मचारी नितीन संकपाळ व हेमंत वायचळ यांनी घटनास्थळी पोहोचताच धाडसाने अग्निशमन यंत्राद्वारे फवारणी करून घरातील गॅस सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढला. बेडरूममध्ये आग मोठ्या प्रमाणात भडकलेली असल्याने आग विझविणे आव्हानात्मक ठरत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नितीन संकपाळ यांनी घराच्या छतावरील पत्रे फोडून आत पाण्याचा मारा केला. त्यामुळे अखेर आग आटोक्यात आली आणि शेजारच्या घरांमध्ये आग पसरण्याचा मोठा धोका टळला. या आगीत घरातील कपडे, इलेक्ट्रिक उपकरणे, संसारोपयोगी साहित्य, मुलीच्या प्रसूतीसाठी राखून ठेवलेली कपाटातील ९० हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच सोन्या-चांदीचे दागिने जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेनंतर तलाठी एस. एस. खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच ग्रामपंचायत अधिकारी संजय पुकाळे, पोलीस निरीक्षक संतोष माने, माजी सरपंच संजय अनुसे, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे आणि शीतल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन केले व शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
घरातील सर्वकाही डोळ्यांसमोर जळून खाक झाल्याने आयुब बेपारी यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. विशेषतः मुलीच्या प्रसूतीसाठी जपून ठेवलेली रक्कम आणि संसाराचा आधार असलेले साहित्य आगीत नष्ट झाल्याने कुटुंबीयांचे ओक्साबोक्शी रडणे उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू आणणारे ठरले.