Kurundwad Protesters Clash : पंचगंगा प्रदूषणावरून कुरुंदवाड पेटले; पोलिसांशी झटापट, साडेपाच तास चौक बंद!

कृष्णा पाणी योजनेला टाळे ठोकण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले; प्रशासनासोबतची बैठक निष्फळ ठरल्याने पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू
Kurundwad Protesters Clash : पंचगंगा प्रदूषणावरून कुरुंदवाड पेटले; पोलिसांशी झटापट, साडेपाच तास चौक बंद!
Published on
Updated on

कुरुंदवाड : पंचगंगा नदीतील औद्योगिक प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावरून कुरुंदवाड शहरात आज तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. इचलकरंजी कृष्णा पाणी योजनेच्या मजरेवाडी येथील केंद्राला टाळे ठोकण्यासाठी निघालेल्या 'आंदोलन अंकुश' संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पालिका चौकातच अडवले. यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की व झटापट झाली. काही कार्यकर्ते थेट पोलीस वाहनांसमोर आडवे झोपले, तर काहींनी दुचाकी रस्त्यावर टाकून वाहतूक रोखली. या हायव्होल्टेज ड्रामुळे पालिका चौक तब्बल साडेपाच तास पूर्णपणे ठप्प झाला होता.

आंदोलनाचा मुख्य हेतू आणि पार्श्वभूमी

पंचगंगा नदीत प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी सोडून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आंदोलन अंकुश संघटनेने केला आहे. या प्रदूषणाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि इचलकरंजी महापालिका जबाबदार असल्याचा दावा करत, संघटनेने कृष्णा पाणी योजना केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.

पोलिसांशी झटापट अन् रास्तारोको

सकाळपासूनच पालिका चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. मोर्चा मजरेवाडीकडे रवाना होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस वाहनांचा मार्ग रोखला. आंदोलक रस्त्यावरच आडवे झोपल्याने परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, शिवाजीराव गायकवाड आणि संतोष माने यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांना चर्चेसाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

पोलीस ठाण्यातील बैठक आणि आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

पोलीस ठाण्यात तहसीलदार अनिलकुमार हेळकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अंकुश पाटील आणि आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चूडमुंगे यांच्यात बैठक झाली. यावेळी संघटनेने सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी सोडण्यासाठी उपलब्ध असलेल्या शेतीचा संपूर्ण तपशील जाहीर करावा. प्रत्यक्ष पाहणी करूनच पाणी सोडण्याची प्रक्रिया राबवावी; शेती उपलब्ध नसल्यास प्रक्रिया केंद्र सुरू करू नये. काळ्या ओढ्याकडे पाणी वळविण्यासाठी उभारलेला बांध तातडीने बंद करावा, अशा विविध मागण्या मांडल्या.

बैठक निष्फळ का ठरली?

या मागण्यांबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. सायंकाळी उशिरा प्रशासनाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, "या बैठकीला कोण उपस्थित राहणार हे लेखी द्या," अशी मागणी धनाजी चुडमुंगे यांनी केली. तहसीलदार हेळकर यांनी स्वतःचे लेखी पत्र देण्याची तयारी दर्शवली, पण आंदोलकांनी ती नाकारल्याने ही शेवटची बैठकही निष्फळ ठरली.

'ठोस कारवाई होईपर्यंत मागे हटणार नाही!'

प्रशासकीय बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संतप्त आंदोलकांनी पुन्हा पालिका चौकात येऊन आपले ठिय्या आंदोलन सुरू केले. सध्या कुरुंदवाडमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस निर्णय आणि प्रभावी कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news