

कुंभोज : हातकणंगले तालुक्यातील कुंभोज - दानोळी रोडवरील शिवेवर पाराज यांच्या मळ्याजवळ शनिवार रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दानोळीहुन - कुंभोजकडे जाणाऱ्या कुंभोज येथील गणेश कोळी यांच्या चारचाकी टेम्पो गाडीच्या समोरुन अचानक बिबट्याचे दर्शन झाले. हा बिबट्या बाबुजमाल डोंगराच्या दिशेने गेल्याचे सांगितले आहे.
ही घटना कळताच कुंभोज व दानोळी गावातील नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. यावेळी कुंभोज व दानोळी गावातील नागरिकांनी पाराज यांच्या मळ्याजवळ मोठी गर्दी केली होती. तसेच बिबट्याचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी त्या परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत असताना दानोळी परिसरातील भोपाल चंदोबा यांच्या शेतात कोणत्यातरी प्राण्याचे ठसे आढळले आहेत.
त्यामुळे नेमके हे ठसे बिबट्याचे आहेत किंवा अन्य कोणत्या प्राण्याचे हे वनविभागाचे अधिकारी आल्याशिवाय समजायला वाव नाही. त्यामुळे नागरिकांनी त्या परिसरात रात्री अपरात्री मळ्यातील लोकांनी व शेतकऱ्यांनी शेतात पाणी पाजायला जाऊ नये असे आवाहन ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले आहे.