

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या बिळूर येथे प्रवचनादरम्यान लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शंकरगौंड शिवनगौंड बिरादार (रा. बसवन बागेवाडी, जि. विजयपूर) यांनी स्वामींविरोधात फिर्याद दिली. धर्मातील आरक्षणाच्या विषयावर स्वामींनी केलेल्या वक्तव्यांवर फिर्यादीने आक्षेप घेतला असून, हे वक्तव्य समाजात द्वेष पसरवणारे आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी कर्नाटकातील बसवन पोलिस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल झाला होता. तो गुन्हा पुढील प्रक्रियेसाठी जत पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर रोजी बिळूर विरक्त मठात स्वामींचे प्रवचन झाले होते. त्यातील काही विधानांवरून हा वाद निर्माण झाला.
काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले की, कर्नाटकात लिंगायत समाजाला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांविषयी त्यांनी प्रवचनात टिप्पणी केली होती आणि काही लोकप्रतिनिधी हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावरून कर्नाटक सरकारने जाणूनबुजून तक्रार दाखल केल्याचा आरोप स्वामींनी केला. हा गुन्हा पूर्णपणे राजकीय दबावाखाली आणि खोडसाळ हेतूने दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले. आपल्या प्रवचनाचा उद्देश समाजाला जोडण्याचा होता, तोडण्याचा नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूरच्या दक्षिणेला 12 किमीवर असलेल्या कणेरी गावातील सिद्धगिरी मठाचे 49 वे मठाधिपती म्हणजे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी. 1964 साली विजापूर येथे जन्म. उच्च शिक्षण घेतल्यानंतर 1989 मध्ये ब्रह्मलीन मुप्पिन काडसिद्धेश्वर महाराजांच्या आदेशाने त्यांनी मठाची सूत्रे स्वीकारली.
त्यांच्या नेतृत्वाखाली
मठाचा मोठा विकास झाला
50 पेक्षा जास्त ग्रंथ प्रकाशित
शिक्षण, पर्यटन, कृषी, गोशाळा, ग्रामीण संग्रहालय, रुग्णालय यांसारखे उपक्रम वाढले
सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशनद्वारे अनेक प्रकल्प सुरू
मोठी गोशाळा व ग्रामीण संस्कृती दाखवणारे म्युझियम लोकप्रिय पर्यटन स्थळ
मठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दशकांपेक्षा जास्त काळ एकाच मठाधिपतीने कार्यभार सांभाळला आहे.