

Sambhajiraje Chhatrapati on Prada Kolhapuri chappal design copy
कोल्हापूर : इटालियन फॅशन ब्रँड असलेल्या कंपनीच्या फॅशन शोमध्ये मॉडेल्सच्या पायात असलेल्या कोल्हापुरी पायतानाचा उल्लेख 'लेदर फुटवेअर' असा करत कोल्हापुरी चप्पलचे नाव न घेणाऱ्या प्रादा नावाच्या कंपनीविरोधात सध्या देशभरात संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापुरी चप्पल उत्पादक, कोल्हापुरीप्रेमी आणि सोशल मीडियावरील नेटिझन्स यांनी याविरोधात टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी देखील तीव्र शब्दात या कंपनीला सुनावले आहे.
प्राडा नावाच्या एका परदेशी फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलची नक्कल करून ती स्वतःच्या नावाने बाजारात आणली आहे. या कंपनीने कोल्हापुरी चप्पलचा मूळ, तिचा इतिहास, कोल्हापूर परिसरातील कारागिरांची कला किंवा भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा कोणताही उल्लेख केलेला नाही. ही केवळ एका डिझाइनची चोरी नाही, तर कोल्हापूरचा समृद्ध वारसा आणि शेकडो वर्षांपासून तो जपणाऱ्या कारागिरांची फसवणूक आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी या कलेला आणि कारागिरांना राजाश्रय देऊन कोल्हापुरी चप्पल निर्मितीच्या व्यवसायाला मोठी चालना दिली. कोल्हापुरी चप्पल हे केवळ एक फॅशन स्टेटमेंट नसून, शेकडो वर्षांची कारागिरी, कौशल्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत असताना, तिची मूळ ओळखही तिथे पोहोचली पाहिजे. ज्या कारागिरांनी ही कला शेकडो वर्षे जपली, वाढवली आणि विकसित केली, त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. या कलेमागील संस्कृती, वारसा आणि परंपरा जगाला कळावी, यासाठीच कोल्हापुरी चप्पलला २०१९ मध्ये जीआय (GI) मानांकन मिळाले. या सर्व नियमांचे पालन करून जर या कंपनीने कोल्हापुरी चप्पल विकली असती, तर कोल्हापुरी जगभर पोहोचल्याचा आनंदच झाला असता. मात्र, थेट डिझाइनची नक्कल करून, चप्पलची मूळ ओळख लपवून ती स्वतःच्या नावाने विकणे हे सांस्कृतिक विनियोगाचे उत्तम उदाहरण असल्याचे संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
देशभरातून सोशल मीडियावर याबद्दल तक्रारी केल्या जात आहेत, परंतु प्राडा कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जर कंपनीने वेळीच आपली चूक सुधारून, कोल्हापुरी चप्पलची खरी ओळख न लपवता ती बाजारात आणली, तर आम्ही त्याचे स्वागत करू. भारत सरकारने आपल्या शेकडो वर्षांच्या संस्कृतीची आणि कलेची नक्कल करणाऱ्या कंपन्यांविरोधात ठोस पावले उचलण्याची गरज आहे. तसेच, ग्राहक म्हणून आपणही याविरोधात आवाज उठवून अशा कंपन्यांना वेळीच आपली चूक सुधारण्यास भाग पाडले पाहिजे. भारतीय संस्कृती आणि परंपरेशी जोडलेले कोणतेही अस्सल भारतीय उत्पादन जागतिक स्तरावर जाताना, त्याची मूळ ओळख कायम राहिली पाहिजे आणि त्या उत्पादनाबरोबरच भारतीय संस्कृती आणि परंपराही जगभर पोहोचली पाहिजे, हाच त्यामागील उद्देश असायला हवा, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.