

सदस्यांचा ६०-४० टक्के सूत्राला विरोध
मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन निर्णयावर चर्चा करणार
कोल्हापूर : जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीच्या वाटपावरून निर्माण झालेली नाराजी अद्याप कायम आहे. काँग्रेसच्या सदस्यांपाठोपाठ आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनीही निधी वाटपाच्या सूत्राला विरोध दर्शविला आहे. गुरुवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत सदस्यांनी आपली नाराजी व्यक्त करत जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. यावर गटनेते सुधीर देसाई आणि संग्राम कुपेकर यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन देत सदस्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा परिषदेसाठी जिल्हा नियोजन समितीकडून वर्ग करण्यात आलेल्या निधीचे आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्यात ६०-४० या प्रमाणात वाटप करण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र, या सूत्राला जिल्हा परिषद सदस्यांचा विरोध आहे.
हा निधी जिल्हा परिषद सदस्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी असून, त्यावर सदस्यांचाच हक्क असल्याची त्यांची भूमिका आहे. दुसरीकडे, आमदारही निधीवरील आपला दावा सोडण्यास तयार नसल्याने निधी वाटपाचा तिढा कायम आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांनी अध्यक्षा शिल्पा खोत यांची भेट घेऊन निधी वाटपाच्या सूत्राला विरोध दर्शविला होता. त्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनीही याच मुद्द्यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे निधी वाटपावरून जिल्हा परिषदेतील राजकीय अस्वस्थता वाढली असून, या प्रश्नावर आता पक्षीय पातळीवर नेत्यांच्या हस्तक्षेपाची प्रतीक्षा आहे.