

Yadrav Parvati Industrial Estate fire
यड्राव : येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या हॅपी पाश्चर या दुध प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यात साठवून ठेवलेल्या बगॅसला भीषण आग लागली. आग इतकी तीव्र होती की परिसरातील नारळ, लिंबू तसेच इतर हिरवीगार झाडेही जळून खाक झाली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
कारखान्यातील बॉयलरसाठी लागणारे पाल्याचे गट्टे व बगॅस मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेत साठवण्यात आले होते. दुपारी सुमारे तीन ते साडेतीनच्या दरम्यान अचानक आग लागली आणि काही क्षणांतच संपूर्ण साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
आगीची तीव्रता लक्षात घेता इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड आणि हातकणंगले येथील अग्निशमन दलांना तातडीने पाचारण करण्यात आले. अनेक अग्निशमन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. खबरदारीचा उपाय म्हणून कारखान्यातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांना तातडीने बाहेर काढण्यात आले.
आगीमुळे दूरवरपर्यंत धुराचे लोट व उष्णतेची धग जाणवत होती. त्यामुळे परिसरातील इतर कारखान्यांतील कामगार व नागरिकही बाहेर येऊन थांबले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू असून, नुकसानीचा अचूक अंदाज घेतला जात आहे.