

Rukadi Zilla Parishad School Fire Incident
रुकडी : रुकडी (ता. हातकणंगले) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्या मंदिर क्रमांक २ या शाळेतील एका वर्गखोलीला शुक्रवारी (दि. २७) दुपारी अचानक आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शाळेत एकूण नऊ वर्गखोल्या असून पूर्वेकडील तीन खोल्या जीर्ण अवस्थेत आहेत. या खोल्यांचे छत पडझड झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित खोल्यांमध्ये जुनी पुस्तके, मोडकळीस आलेले फर्निचर, कपाटे व इतर निरुपयोगी साहित्य ठेवण्यात आले होते.
शुक्रवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास खोली क्रमांक १ मध्ये अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि खोलीतील साहित्य तसेच लाकडी छत जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे यांनी इचलकरंजी महापालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. सरपंच राजश्री रुकडीकर, उपसरपंच पाकीजा मुल्लानी, शीतल खोत, संतोष रुकडीकर, राजू मुल्लानी, शमुवेल लोखंडे, रणजित कदम तसेच माजी सरपंच रफिक कालावंत हे ग्रामपंचायतीच्या दोन पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान, शाळेच्या दुरुस्तीबाबत नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत बैठकीत मुख्याध्यापक व शिक्षकांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर अल्पावधीतच ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वेळीच आग विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. शाळेच्या मागील बाजूस काही रहिवाशांनी वर्षभरासाठी लागणारे सरपण, शेण्या, वाळलेला चारा आदी साहित्य साठवून ठेवले आहे. त्यास आग लागली असती तर संपूर्ण शाळा इमारतीला वेढा बसण्याची शक्यता होती.
आग विझवताना ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष कांबळे यांनी जीवाची पर्वा न करता धुराने भरलेल्या खोलीत प्रवेश केला. मात्र प्रचंड धुरामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यांना तातडीने इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनेची माहिती मिळताच गटशिक्षण अधिकारी नम्रता गुरसाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.