

सुभाष पाटील
विशाळगड : ऐतिहासिक पावनखिंड आणि पांढरेपाणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाल्याने वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वारणानगर येथील वारणा विज्ञान केंद्रास भेट देण्यासाठी गेलेले शालेय विद्यार्थी आणि बस चालक सयाजी मोरे रात्री १० च्या सुमारास परतत असताना, त्यांना रस्त्यातच बिबट्याचे दर्शन झाले. अचानक समोर आलेल्या बिबट्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराट पसरली होती. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.
विशाळगड, पावनखिंड परिसर हा घनदाट झाडी आणि डोंगराळ भागाचा असल्याने येथे वन्यजीवांचा वावर नेहमीच असतो. मात्र, आता बिबट्या थेट रस्त्यावर तसेच वस्तीत येऊ लागल्याने स्थानिक नागरिक आणि दुर्गप्रेमींमध्ये भीती निर्माण झाली आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे, तर स्थानिक नागरिकांनाही या बिबट्याने दर्शन दिले आहे. केंबूर्णेवाडी येथील आनंद जाधव हे मलकापूरहून आपल्या गावी परतत असताना त्यांना दोन वेळा बिबट्या दिसला. रासपचे जिल्हा उपाध्यक्ष अभी पाटील यांनाही या भागात आले असता काही दिवसांपूर्वी रात्री ८ च्या सुमारास याच परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे.
या भागात पर्यटकांची आणि भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र, बिबट्याच्या सततच्या दर्शनामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे आता धोक्याचे बनले आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
* रात्रीच्या वेळी दुचाकीवरून प्रवास करणे टाळावे.
* सोबत टॉर्च किंवा मोठ्या आवाजाचे साधन ठेवावे.
* एकटे न फिरता समूहाने प्रवास करावा.
* घराच्या परिसरात पुरेसा उजेड ठेवा.
* लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका.
आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन रात्री १० च्या सुमारास पांढरेपाणी परिसरातून जात होतो. अचानक हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्यावर बिबट्या उभा असलेला दिसला. त्याला पाहून काळजाचा ठोका चुकला, पण मी गाडी थांबवून मुलांची सुरक्षा महत्त्वाची मानली. काही वेळातच तो जंगलाच्या दिशेने निघून गेला. तो अनुभव खूपच थरारक होता.
सयाजी मोरे, चालक (वारणा विज्ञान केंद्र)