

Vishalgad Amba Gaur Sighting
विशाळगड : विशाळगड-आंबा मार्ग हा निसर्गसौंदर्याने नटलेला असला, तरी एका थरारक अनुभवाचा प्रत्यय प्रवाशांना आला. घनदाट वनराई आणि नागमोडी वळणांच्या या मार्गावर अचानक पाच ते सहा धिप्पाड गव्यांचा कळप भररस्त्यात अवतरल्याने पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही काळ भीतीचे, तर काही काळ कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले होते.
हा परिसर मुळातच घनदाट झाडी, दुर्मीळ पशू-पक्षी आणि वन्य प्राण्यांसाठी ओळखला जातो. शुक्रवारी सकाळी काही पर्यटक आपल्या वाहनांनी गडाच्या दिशेने कूच करत असताना, एका वळणावर झाडीतून एकापाठोपाठ एक असे पाच-सहा महाकाय गवे रस्त्यावर आले.
क्षणार्धात समोर जणू 'साक्षात यमदूत' उभा ठाकल्याच्या आविर्भावात या धिप्पाड प्राण्यांना पाहून वाहनधारकांच्या काळजाचा ठोका चुकला. अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे पर्यटकांची मोठी भंबेरी उडाली आणि धावत्या वाहनांना जागीच ब्रेक लागला.
काही धाडसी पर्यटकांनी हा थरार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सध्या विशाळगड आणि पावनखिंड परिसरात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. घाटातील अरुंद रस्ते आणि वनराई यामुळे वन्यप्राणी अनेकदा मानवी हस्तक्षेपामुळे बिथरण्याची शक्यता असते.
त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांनी वेग मर्यादित ठेवावा आणि वन्यप्राणी दिसल्यास त्यांना त्रास न देता शांतपणे मार्गस्थ व्हावे, असे आवाहन निसर्गप्रेमींकडून केले जात आहे.